मुख्यमंत्र्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? ’भावी सहकारी’ वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे,
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावी सहकारी म्हणत केलेल्या वक्तव्याने विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यासोबतच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना नेमकं काय म्हणालयचं आहे? आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय? असे प्रश्न विचारले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ऊूला अक्षळीं झरुरी) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय हे मी कस सांगू? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय कसं चालवायचं, समस्या काय याच्याच चर्चा होतात. आज पूर्णपणे बहुमत महविकास आघाडीकडे आहे.
उद्धव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, त्यांच्या शुभेच्छा… चांगली गोष्ट आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. मात्र, भाजपची भूमिका अगदी स्पष्ट आहे. आम्ही सत्तेकडे डोळे लावून बसलेलो नाहीत. आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका करत आहोत.
हे जे काही अनैसर्गिक गठबंधन बनलं आहे ते फारकाळ चालू शकत नाही. मला असं वाटतं कदाचित मुख्यमंत्र्यांच्याही लक्षात आलं असेल की अशा प्रकारचं अनैसर्गिक गठबंधन करुन महाराष्ट्राचं नुकसान होत आहे आणि म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंगाबाद येथील कार्यक्रमात मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, ‘व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी‘ असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.
जाहीर व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या या विधानाने आता शिवसेना-भाजपची पुन्हा युती होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले हे सूचक वक्तव्य आहे का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या कार्यक्रमात काँग-ेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते.
कालच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. झालं असं की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या विधानाने शिवसेना-भाजप पुनहा एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.