बिग बास्केट कंपनीच्या बावधनमधील गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
पुणे
सोमवारी रात्री बावधान बुद्रुकमधील बिग बास्केट या ऑॅनलाइन किराणामाल आणि भाजीपाला विक्री करणार्या गोडाऊनला आग लागली. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास गोडाऊनला ही आग लागली. रात्रीच्यावेळी आग लागल्याने गोडाऊनमध्ये फार लोक नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र या आगीत गोदामातील धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायर इंजिन्सच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.
बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे 25 हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे 12 ते 13 शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली. गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली.
आग विझवित असतानाच तेथील व्यवस्थापकाने आत तिजोरी असून त्यात मोठ्या प्रमाणावर पैसे असल्याचे सांगितले. तेव्हा अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी आत प्रवेश करुन ती तिजोरी बाहेर आणली. त्यातील 8 लाख रुपये वाचविण्यात यश आले. मात्र, तिजोरी जवळील टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे 2 लाख रुपये जळून खाक झाले. सुमारे 3 तास ही आग धगधगत होती.