…म्हणून पालिकेतील कर्मचारी बनला सराईत गुन्हेगार; 50 महागड्या मोबाइलवर मारला डल्ला

पुणे,

डोक्यावर झालेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पुणे महानगर पालिकेतील एक कर्मचारी सराईत गुन्हेगार बनला आहे. त्यानं कर्ज फेडण्यासाठी तब्बल 50 महागडे फोन चोरले आहेत. दरम्यान आरोपी कर्मचारी रस्त्यावर उभं राहून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना चोरीचा मोबाइल विकत होता. पण पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याच्या पार्ट टाइम चोरीच्या व्यावसायाचं बिंग फुटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 88 हजार रुपये किमतीचे 21 मोबाइल फोन जप्त केले आहेत.

तानाजी शहाजी रणदिवे असं अटक केलेल्या 33 वर्षीय आरोपी कर्मचार्‍याचं नाव आहे. आरोपी रणदिवे हडपसर परिसरातील रामटेकडी, शांतीनगर येथील रहिवासी आहे. तो सध्या पुणे महानगर पालिकेतील आरोग्य विभागात काम करतो. मागील काही दिवसांपासून आरोपी रणदिवे याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. हे कर्ज फेडण्यासाठी आरोपीनं मोबाइल चोरी करण्याचा नवीन पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला होता. पण त्याचा हा लुटमारीचा व्यवसाय फार काळ टिकला नाही.

दरम्यान पुण्यात मोबाइल चोरीच्या अनेक घटना समोर येत होत्या. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली होती. दरम्यान बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत असताना, आरोपी तानाजी रणदिवे याठिकाणी चोरीचे मोबाइल विकायला येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीवर नजर ठेवून होते.

दरम्यान आरोपी रणदिवे हा रस्त्यावर उभं राहून येणार्‍या जाणार्‍या लोकांना मोबाइल विकत घेण्याबद्दल विचारणा करताना दिसला. यावेळी पोलीस पथकानं त्याला थांबवून त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडे सहा चोरीचे मोबाइल फोन आढळले. याबाबत त्याची चौकशी केली असता, त्यानं उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली. पण पोलिसी खाक्या दाखवताच तो पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी करत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. तसेच कर्ज फेडण्यासाठी मोबाइल चोरी केल्याचं कबुल केलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!