पुण्यात भाजप नगरसेवकाच्या खूनाचा कट, पाच-सहाजण करत होते रेकी
पुणे,
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धीरज घाटे यांच्या खूनाचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी पाच ते सहा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी उर्फ अतुल वामन क्षीरसागर, मनोज संभाजी पाटोळे आणि त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धीरज घाटे हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असून आंबील ओढा परिसरातून ते निवडून आले आहेत. संशयित आरोपी विकी आणि मनोज हे यापूर्वी धीरज घाटे यांच्यासोबत काम करत होते. परंतु काही वर्षापूर्वी त्यांनी घाटे यांच्यासोबत काम करणे बंद केले.
आरोपी विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर हा मनसेचा कार्यकर्ता असून तो आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. आगामी महापालिका निवडणूक राकेश क्षीरसागर यांनी सहज जिंकावी म्हणून आरोपींनी धीरज घाटे यांच्या खुनाचा कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
3 सप्टेंबरच्या दुपारी फिर्यादी घाटे हे लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील शेफ्रोन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गेले होते. यावेळी हॉटेलमध्ये बसलेले तिघेजण घाटे यांच्याकडेच पाहत होते. घाटे यांच्या हलचालींवर कोणीतरी लक्ष ठेवून आहे, त्यांची रेकी केली जात असल्याचा त्यांना संशय आल्याने त्यांच्या सोबत असणारा कार्यकर्ता हॉटेल बाहेर गेला तेव्हा त्यांना वरील संशयित आरोपी बाहेर थांबले असल्याचे आढळले. जवळपास अर्धा तास ते घाटे यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर सहा सप्टेंबर रोजी देखील असाच प्रकार घडला. त्यानंतर घाटे यांनी संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यांना खात्री झाली की ते हल्ल्याच्या तयारीने आले होते. ही सर्व माहिती त्यांनी तक्रारीत दिली आहे.
या प्रकारानंतर पोलिसांनी पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.