पुणे: विदेशातील भावाचा डीपी ठेवून व्यावसायिकाला गंडवलं; अजब फंडा वापरून 4 लाखांना लुटलं
पुणे,
विदेशात राहणार्या चुलत भावाच्या फोटोचा वापर करत पुण्यातील एका व्यावसायिकाला तब्बल 4 लाख रुपयांना गंडवल्याची घटना समोर आली आहे. आरोपीनं विदेशात राहणार्या फिर्यादीच्या चुलत भावाचा फोटो आपल्या व्हॉटसअॅपला डिस्प्ले पिक्चर (डीपी) अर्थात प्रोफाइल फोटो ठेवून फिर्यादीची दिशाभूल केली आहे. अज्ञात सायबर भामट्यानं भारतातील एका मित्राला वैद्यकीय कारणांसाठी पैशाची गरज असल्याचं सांगत फिर्यादीकडून 4 लाख रुपये लुटले आहेत. याप्रकरणी फिर्यादीनं सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील रहिवासी असणार्या 53 वर्षीय व्यावसायिकाचा चुलत भाऊ अमेरिकेत राहातो. दरम्यान 12 जुलै रोजी त्यांना एक व्हॉटसअॅप कॉल आला. संबंधित व्हॉटसअॅप नंबरवर फिर्यादी व्यावसायिकाच्या चुलत भावाचा फोटो डीपी म्हणून वापरण्यात आला होता. त्यामुळे संबंधित कॉल आपल्या चुलत भावानेच केला असावा, असा समज फिर्यादी व्यावसायिकाचा झाला. यावेळी व्हॉटसअॅप कॉलवरून येणारा आवाज अडखळत आणि खरखर येतं होता.
त्यामुळे त्यांना आपल्या भावाचा आवाज व्यवस्थित ओळखता आला नाही. यानंतर त्याच क्रमांकावरून अज्ञात सायबर चोरट्यानं फिर्यादीचा भाऊ असल्याचं भासवत चॅटींग सुरू केलं. तसेच भारतातील एका मित्राला वैद्यकीय कारणांसाठी पैशांची आवश्यकता असल्याचं सायबर चोरट्यानं फिर्यादीला सांगितलं. तसेच बँक खाते क्रमांक पाठवून पैसे पाठवण्यास सांगितलं. आपल्या चुलत भावानंच पैसे पाठवायला सांगितल्याचा समज होऊन फिर्यादीनं दिलेल्या क्रमांकावर 4 लाख रुपये ट्रान्सफर केले.
पण काही दिवसांनी फिर्यादींचा आपल्या चुलत भावाची संपर्क झाल्यानंतर, त्यांनी अशा प्रकारे कोणताही मेसेज केला नसल्याचं सांगितलं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं फिर्यादीच्या लक्षात आलं. यानंतर फिर्यादीनं तातडीनं सायबर पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात आतापर्यंत अशाप्रकारच्या सायबर गुन्ह्याचं पहिलंच प्रकरण समोर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहेत. तसेच बँक खाते आणि व्हॉटसअॅप नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.