पश्चिम महाराष्ट्रात महावितरणचा वीजचोरांना दणका 1.18 कोटींच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश
पुणे प्रतिनिधी
पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 1047 ठिकाणी अनधिकृत वीजवापर करणार्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये वीजतारेच्या हूकद्वारे किंवा मीटरमध्ये फेरफार केलेल्या 756 वीजचोर्यांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणार्या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याचे कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान या महिन्यात आतापयर्ंत पुणे प्रादेशिक विभागात सुमारे 1 कोटी 18 लाख रुपयांच्या 1310 ठिकाणी वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध महावितरणची नियमित कारवाई सुरु आहे. ही कारवाई आणखी वेगाने व धडकपणे करण्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये दि. 21 ऑगस्टला वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे सकाळी 9 वाजता सर्वच जिल्ह्यांमध्ये या मोहीमेला सुरवात झाली व सायंकाळी उशिरापयर्ंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींचे 5 हजार 956 वीजजोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा- 574, सातारा- 130, सोलापूर- 107, कोल्हापूर- 116 व सांगली जिल्ह्यात 120 असा एकूण 1047 ठिकाणी अनधिकृतपणे वीजवापर सुरु असल्याचे आढळून आले.
या एक दिवसीय विशेष मोहिमेत प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्यासह प्रादेशिक विभागातील वरिष्ठ अधिकारी, अभियंते व जनमित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोबतच महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी देखील वीजचोर्या उघड करण्यास विशेष सहकार्य केले. उघडकीस आलेल्या वीजचोर्या विशेषत: सधन व सुशिक्षित घरगुती, व्यावसायिकांसह कृषीग्राहकांकडील आहेत. वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित आलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणार्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
पुणे प्रादेशिक विभागात या महिन्यात आतापयर्ंत 1310 ठिकाणी 1 कोटी 18 लाख रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आणला आहे. यातील 99 प्रकरणांमध्ये 21 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये (कंसात रक्कम) पुणे जिल्हा- 580 (64.59 लाख), सातारा- 275 (16 लाख), सोलापूर- 205 (22.24 लाख), कोल्हापूर- 130 (13.40 लाख) आणि सांगली जिल्ह्यामध्ये 120 ठिकाणी 1.92 लाखांचा अनधिकृत वीजवापर उघड झाला आहे. वीजचोरी प्रकरणात ज्यांनी दंडात्मक रकमेसह चोरीच्या वीजवापराप्रमाणे संपूर्ण बिलाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरुद्ध कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. सोबतच वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी वेगवान करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.