पुणे विद्यापीठाचा कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय
पुणे,
सर्वच विद्यार्थ्यांना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचा फटका सहन करावा लागत असल्यामुळे शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून आला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शुल्क कमी करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी घेतला होता. दुर्दैर्वाने ज्या विद्यार्थ्यांनी कोरोनामुळे आपले पालक गमावले आहेत, त्यांच्यासाठी 100 टक्के शुल्क माफ करण्यात आल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.
फीमध्ये सवलत देण्याबाबतचा निर्णय सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केला होता. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल सोबत सादर केला होता. त्यानंतर कुलगुरूंनी समितीचा अहवाल स्वीकारला आणि शिफारसी मंजूर केल्या. त्यानुसार, विद्यापीठाने विविध अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी कोरोना काळात आपले दोन्ही किंवा एक पालक गमावले आहेत, त्यांना फीमध्ये 100 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही फीमध्ये कपात केवळ शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी लागू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांना लेखी अर्ज केल्यानंतर त्यांना हप्त्यांमध्ये शुल्क भरता येणार आहे. वसतिगृह निवास शुल्क तेव्हाच लागू होईल, जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये येतील.