प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोच्या कलाकारांनी ’आझादी का अमृत महोत्सवा’ला चढवला देशभक्तीपर गीतांचा साज
पुणे,
पुणे येथील ‘आरओबी’ अर्थात प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो व ‘एनएफएआय’ अर्थात राष्ट्रीय चित्रपट संग-हालय, भारत सरकार यांच्या वतीने स्वात्यंत्रदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असे अनेक कार्यक्रम आरओबी च्या वतीने आयोजित केले जाणार असून त्याची सुरुवात स्वातंत्र्यदिनी झाली.
पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग-हालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरोच्या कलाकारांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारावून गेले होते. मकरंद मसराम या प्रमुख गायकांसह, कुमुद काकोनिया, उपाधी सिंह, डॉ. ममता झा-मसराम, विनोद निनारिया, गौतमी गोसावी, सुबोध चांडवडकर यांनी गीत सादरीकरण केले. मंदार गुप्ते यांनी तांत्रिक सहाय्य तर डॉ. पंकज दाभाडे यांनी सूत्रसंचालन केले.
राष्ट्रीय चित्रपट संग-हालय आणि आरओबीचे संचालक प्रकाश मगदूम यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहपरिवार उपस्थित होते. विभागातील कलाकारांना त्यांनी यावेळी कौतुकासह शुभेच्छा दिल्या.
विभागाचे उपसंचालक निखिल देशमुख, व्यवस्थापक डॉ. जितेंद्र पानपाटील, वरिष्ठ लेखा अधिकारी एन. के. वर्मा आणि दोन्ही विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.