आठ महिन्यात 114 किलो ड्रग्ज जप्त….
पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा
पणजी- 18 ऑक्टोबर –
गोवा पोलिसांनी गेल्या 8 महिन्यांत 114 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. बाजारपेठेत या ड्रग्जची किंमत 3 कोटी रुपयांहून अधिक आहे. अंमली पदार्थांच्या विरोधात सध्या पोलिसांनी कारवाई तीव्र केली असून दर आठवड्यात सरासरी 3 ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गेल्या 8 महिन्यामध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजा, चरस, एलएसडी, एमडीएमए, एक्स्टसी गोळ्या, पावडर, कोकेन, चरस तेल, हेरॉइन आणि गांजा यांचा समावेश आहे, हे सर्व एकूण 91 किलोपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गोवा राज्यात अमली पदार्थ आयात करत बहुतेक पार्ट्यांमध्ये वापरले जातात. या कारवायांमध्ये अटक करण्यात आलेले आरोपी राज्यातील नसुन परप्रांतीयच असतात अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच जप्त करण्यात आलेल्या बहुतेक अंमली पदार्थांमध्ये गांजा आणि चरस यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना साथरोगानंतर राज्यातील पर्यटनाने पुन्हा वेग घेतल्याने ड्रग्ज देखील राज्यात येऊ लागले आहेत. यावर आळा घालण्यासाठी आम्ही बारीक नजर ठेवली आहे.राज्यात सध्या दर आठवड्याला सरासरी तीनहून अधिक अंमली पदार्थांवर छापे टाकले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.