केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते चष्म्याचे गरजूंना मोफत वाटप..
पणजी, 14 नोव्हेंबर 2021
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज करमळी येथे चष्म्याचे गरजूंना मोफत वाटप करण्यात आले. श्रीपाद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त 4 ऑक्टोबर रोजी मोफत नेत्रतपसाणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 1 हजार नागरिकांनी नेत्रतपासणी केली होती, त्यापैकी 500 गरजूंना आज चष्मे वितरीत करण्यात आले. प्रसाद नेत्रालय, उडपी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आरोग्याकडे लक्ष देत असताना डोळ्यांची देखभाल तेवढीच महत्त्वाची आहे. सृष्टी पाहण्यासाठी दृष्टीची आवश्यकता असते. त्यामुळे अशाप्रकारे गरजवंतूंसाठी नेत्रतपासणी शिबीर आणि चष्मा वाटप करण्यात येत असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. गेल्या चार वर्षापासून प्रसाद नेत्र रुग्णालयाच्या सहकार्याने 25 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून सुमारे 20 हजार नागरिकांना याचा लाभ झाला आहे. यापुढेही अशाप्रकारे शिबिरांचे आयोजन सुरु राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.
4 ऑक्टोबर रोजी झालेल्या नेत्रतपासणी शिबिरात 500 नागरिकांना चष्म्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले, तसेच 60 नागरिकांवर डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.