हिंदी भाषेत विशेष भारतीय सांस्कृतिक मुल्ये आहेत, जी जगभर अतुलनीय आहेत- केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा
पणजी,
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे आज गोव्यात पश्चिम आणि मध्य क्षेत्र संयुक्त प्रादेशिक राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या केंद्र सरकारची कार्यालये, बँका, सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी आणि अधिकार्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, तर केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची प्रमुख अतिथी म्हणून याप्रसंगी उपस्थिती होती.
राजभाषा संमेलनात बोलताना अजय कुमार मिश्रा म्हणाले की, कोणतीही भाषा किंवा बोली ही केवळ विचारवाहक नसते तर ती देशाची संस्कृती आणि संस्कार निर्माणाचे महत्त्वपूर्ण साधन असते. हिंदीचे भारतात एक विशिष्ट सांस्कृतिक मुल्य आहे, ज्यामुळे ती जगभरात अतुलनीय आहे. हिंदी भाषेत कोट्यवधी भारतीयांच्या भावना आहेत.
अजय कुमार मिश्रा पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदीचा विस्तार केला तसेच हिंदीची व्यापकता लक्षात घेऊन कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात नागरिकांच्या जागरुकतेसाठी हिंदी भाषेचा वापर केला. महामारीच्या सुरुवातीच्या काळात मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि एकमेकांमध्ये योग्य अंतर राखणे या सूचनांचे पालन करण्यात भाषेचे मोठे यश आहे.
सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, तेंव्हा आपण स्वातंत्र्यलढ्याचेदेखील स्मरण केले पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात स्वराज्य, स्वदेशी आणि स्वभाषेवर जोर देण्यात आला होता, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणाले.
पुढे बोलताना अजय कुमार मिश्रा म्हणाले की, आपल्या लोकशाहीचा गाभा आहे ‘सर्वजन हिताय’. राष्ट्रीय पातळीवर राजभाषा हिंदी ही जबाबदारी अतिशय योग्य रितीने पार पाडत आहे.
कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय पर्यटन, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की, कोणत्याही देशासाठी भाषा अस्मितेचे प्रतिक असते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून आजपर्यंत राष्ट्रीय एकतेचे सर्वात मोठे माध्यम हिंदी भाषा राहिले आहे. हिंदी एक समृद्ध आणि सुलभ भाषा आहे. विविधतेतील एकतेचे हिंदी भाषा खर्या अर्थाने उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले की, हिंदीतील उत्तम साहित्याचे प्रादेशिक भाषांमध्ये आणि प्रादेशिक भाषांमधील उत्तम साहित्याचे हिंदी भाषेत भाषांतर होणे आवश्यक आहे. माहिती-तंत्रज्ञान, संशोधन, कायदा, अभियांत्रिकी या विषयांवर मोठ्या प्रमाणात लेखन हिंदीमध्ये होणे आवश्यक आहे. तसेच हिंदी माध्यमात उच्च शिक्षण घेणार्या इच्छुक विद्यार्थ्यांना आपल्या विषयाची पुस्तके हिंदीतून उपलब्ध करुन देण्यात यावीत.
राजभाषा विभागाच्या सचिव सुश्री अंशुली आर्या यांनी राजभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाकडून करण्यात येणार्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. ‘ई महाशब्दकोश मोबाइल ऍप’ आणि ‘ई-सरल हिंदी वाक्य कोश’ विभागाने तयार केले आहेत. तसेच स्मृती आधारित अनुवाद सॉफ्टवेअर ‘कंठस्थ,’ सी-डॅक पुणे यांच्या सहाय्याने विकसित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त 14 भारतीय भाषांमध्ये वैयक्तिकरित्या हिंदी शिकण्यासाठी ‘लीला राजभाषा’ आणि ‘लीला प्रवाह’ याचा प्रचार-प्रसार राजभाषा विभागाकडून केला जात आहे. राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. मीनाक्षी जॉली यांनी आभारप्रदर्शन केले. संमेलनात राजभाषा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 132 अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.