केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हरमल पंचक्रोशी विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन
पणजी,
शिक्षणाला संस्काराची जोड देण्याचे हरमल पंचक्रोशी विद्यालयाने केले. शिक्षणाचा वसा कसा चालवावा याचे हरमल पंचक्रोशी विद्यालय उत्तम उदाहरण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते हरमल पंचक्रोशी विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचा अगदी तीन खोल्यांमधून सुरु झालेला प्रवास आता वटवृक्षाप्रमाणे झाला आहे. ग-ामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या हेतूने संस्थेची स्थापना करण्याचा उद्देश खर्या अर्थाने सफल झाला आहे. आज संस्थेकडे 1800 विद्यार्थी आणि 200 शिक्षक असल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. नाईक यांनी संस्थेला सुरुवातीच्या काळात 25 लाख रुपये खासदारनिधीतून दिल्याची आठवण सांगितली.
राज्यात कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या दृष्टीने सरकार लवकरच राष्ट्रीय विज्ञान न्यायवैद्यक प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय कायदा विद्यापीठ सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना कोडिंग आणि रोबोटीक्सचे शिक्षण देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.