पिंपळगाव बसवंतला आयकर विभागाच्या धाडीत 25 कोटीची रोकड जप्त

१०० कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता रडारवर

रोकड जप्ती मुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

कांदा-द्राक्षाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात आयकर विभागाने पोलीस बंदोबस्तात गेल्या दोन दिवसांपूर्वी धाडी घातलेल्या सात ते आठ कांदा-द्राक्ष व्यापाऱ्यांपैकी एका व्यापाऱ्याकडून तब्बल २५ कोटींची रोकड जमा केल्याने पिंपळगाव बसवंत शहरात खळबळ उडाली असून या धाडसत्र व रोकड जप्तीमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण तर शहरात चर्चेला उधाण आले आहे.
दिवाळी तोंडावर येऊन ठेपल्याने एकीकडे पिंपळगाव बाजार समितीत कांदा दराने साडेचार हजारांचा पल्ला गाठला आहे.तर दुसरीकडे दिवाळी हंगामात कांदा तेजीत राहणार असल्याने कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयकर विभागाच्या सहा पथकातील वेगवेगळ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शहरातील सहा प्रतिष्ठित कांदा व्यापाऱ्यांवर गुरुवार दि.२१रोजी छापमारी करत व्यालार्यांच्या गोडावून, कार्यालय, आडत, दुकाने, घर आदी जवळपास १३ ठिकाणी आयकर विभागाच्या पथकाने झाडाझडती करण्यात केली होती. तर शुक्रवार दि.२२रोजी सलग दुसऱ्या दिवशी आयकरच्या पथकाने पुन्हा त्याच कांदा व्यापाऱ्यांच्या स्थळी धडक मारत सायंकाळी पर्यंत चौकशी होती.शहरातील जोपुळ रोडवरील कुरण भूखंड खरेदी प्रकरणी ही चौकशी झाल्याने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शहरातील एका नामांकित व्यापाऱ्याच्या घरी तब्बल २५ कोटींची रोकड आयकर विभागाला सापडल्याने शहरात चर्चेला मात्र उधाण आले आहे.

संशय ठरला खरा –
पिंपळगाव शहरातील बाजार समिती जोपुळ रोडवर कोरोनाच्या आर्थिक मंदितही अनेक व्यापाऱ्यांनी कुरण क्षेत्रातली कोट्यवधींची मालमत्ता खरेदी कनेक्शनमुळेच ही रोकड सापडल्याची चर्चा शहरात झडत आहे.

या नोटांचा समावेश-
शहरात आयकर विभागाने घातलेल्या छापट्यात शहरातील एक व्यापार्यांकडून २५कोटींची रोकड मिळून आली यात ५००, १००, व २००० च्या सर्वाधिक नोटा मिळून आल्या.

बेहिशोबी मालमत्ता रडारवर-
शहरातील सात ते आठ व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने सलग दोन दिवस लागोपाठ धाडी घातल्या.या छापमारीत व्यापाऱ्यांची सर्व कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात आल्याने अनेक व्यापाऱ्यांकडे १००कोटींहून अधिक बेहिशोबी मालमत्ता असल्याचे बोलले जात असून या सर्व प्रकारामुळे शहरात पुरती खळबळ माजली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!