निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या सपना आशिष बागुल

नवनिर्वाचित सभापती सपना बागुल यांचा सत्कार करताना भास्कर बनकर, सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील, अनिल कुंदे, दिलीप मोरे यांच्यासह शिवसैनिक.

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्या निर्देशाने पिंपळगाव गणाच्या शिवसेनेच्या सदस्या सौ.सपनाताई आशिष बागुल यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.
निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या उपस्थितीत सदस्यांची सभापती पदाच्या निवडीसाठी आज बैठक घेण्यात आली. सभापती पदासाठी सपना बागुल यांच्या अर्जावर पंडित आहेर यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केली. सभापतीपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने सपना बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी घोषित केले.
यावेळी शिवसैनिकांनी गुलाल उधळत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बैठकीस उपसभापती सोनाली बाळासाहेब चारोस्कर, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, शिवा पाटील सुरासे, सोमनाथ पानगव्हाणे, कमल शहाजी राजोळे, रत्ना शंकर संगमनेरे, संजय शेवाळे, गयाबाई सुपनर, दिलीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित सभापती सपना बागुल यांचा जेष्ठ नेते भास्कर नाना बनकर, सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भास्कर बनकर, दिलीप मोरे, सुधीर कराड, खंडू बोडके-पाटील यांनी मनोगत व्यक्त करत बागुल यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील, नगरसेवक अनिल कुंदे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे, देवदत्त कापसे, संजय कुंदे, शहाजी राजोळे, शंकर संगमनेरे, विजय गवळी, प्रकाश वाटपाडे, दीपक शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!