पिंपळगावी सहा कांदा व्यापाऱ्यावर आयकरची छापेमारी!

बंद दाराआड चौकशी : व्यापाऱ्यात भीतीचे वातावरण

निफाड (प्रतिनिधी)-रामभाऊ आवारे

दिवाळी तोंडावर येऊन ठेपल्याने एकीकडे पिंपळगाव बाजार समितीत कांदा दराने साडेचार हजारांचा पल्ला गाठला असताना दुसरीकडे दिवाळी हंगामापूर्वीच आयकर विभागाच्या सहा वेगवेगळ्या पथकाकडून पिंपळगाव बसवंत शहरातील प्रतिष्ठित सहा कांदा व्यापाऱ्यांच्या १३ ठिकाणी गुरुवार दि.२१रोजी सकाळपासून धाडी घातल्याने पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आयकर विभागाच्या सहा वेगवेगळ्या पथकाने गुरुवार दि२१ रोजी सकाळपासून शहरातील सहा प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या गोडावून, कार्यालय, आडत, दुकाने, घर आदी जवळपास १३ ठिकाणी आयकर विभागाच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने झाडाझडती करण्यात केली. आयकर विभागाच्या वतीने कांदा खरेदीच्या पावत्या, कांद्याच्या विक्रीची बिले, आदींसह कर भरण्याबाबत बंद दाराआड कसून चौकशी केल्याचे समजते आहे. दुपारपर्यंत ही चौकशी सुरू होती. दरम्यान या धाडीत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती नेमके काय लागले याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे या धाडसत्रामुळे मात्र यापेक्षा कांदा व्यापारी वर्गात मात्र पुरती घबराट पसरली आहे.

भाव पाडण्याचा डाव –
पिंपळगाव बाजार समितीत कांद्याचे दर जवळपास साडे चार हजारांपर्यंत पोहचले आहे.शिवाय दिवाळीत कांदा दर वधारणार असल्याने कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी व भाव पाडण्यासाठी आयकर विभागाकडून छापमारीची ही खेळी खेळली जात आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याची भावना स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

धाडीनंतर दर कोसळण्याची भीती –
२०१९साली देखील आयकर विभागाने पिंपळगाव बसवंतसह लासलगाव येथील कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी कांदा व्यापाऱ्यांवर धाडी घातल्या होत्या.त्यानंतर बाजार भावात देखील मोठी घसरण झाल्याचे निदर्शनास आल्याने यंदा देखील बाजारभाव घसरण्याची चिन्हे आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!