कार्यकर्ते अजूनही निष्ठावान आहेत हो,नेत्यांनो स्वतःला सुधारा–किरणकुमार आवारे

निफाड प्रतिनिधी– (रामभाऊ आवारे)

आज राजकारणातील चित्र बघितले तर पक्षनेतेच आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाही ही राजकारणातील खूप मोठी हानी आहे, मात्र अशाही परिस्थितीत कार्यकर्ते मात्र एकनिष्ठ आहेत हा मात्र आशेचा किरण आहे.कार्यकर्ते अजूनही निष्ठावान आहेत हो,नेत्यांनो स्वतःला सुधारा असे विचार जेष्ठ पत्रकार किरणकुमार आवारे (शिरवाडे ) यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्षाची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात झाली आहे तेव्हा भारतात निवडणूक नव्हती याचा अर्थ असा की, काँग्रेस पक्षाची निर्मिती ही निवडणूक लढण्यासाठी नव्हती किंवा सत्ता प्राप्ती हे उद्दिष्ट नव्हते, तर या पक्षाची निर्मिती ही केवळ देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी, जनतेला एकत्र आणणे यासाठी झाली होती. जेव्हा हा उद्देश सफल होईल तेव्हा काँग्रेस बरखास्त करा असा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १५ पैकी १२ काँग्रेस कमेट्यांचे मतदान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या बाजूने असतांनाही महात्मा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंतप्रधान केले, पुढे त्यांनी निवडणुकीत किंवा राजकारणात काँग्रेस पक्षाचा वापर केला. आपल्या देशात ८० टक्के हिंदू राहतात आणि देशाचे नाव हिंदुस्थान असले आणि हा देश जातीआधारावर बनला असला तरी काँग्रेस या पक्षाने केवळ धर्मनिरपेक्षता या बेगडी नावाखाली कायम हिंदूंचा अप्रत्यक्ष द्वेष केला. आता हिंदू राष्ट्र आणि या देशात हिंदूंना किंमत नाही म्हणून काही पक्ष तयार झाले आणि त्यांनी उघड उघड हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आपल्यावर शिक्का मारून घेतला. या पक्षांनी ८० टक्के हिंदूंची बाजू घेतली. असे असले तरी काँग्रेस या पक्षाकडून या हिंदुत्ववादी पक्षांना कायम जातीयवादी किंवा नॉनसेक्युलर पक्ष अशी उपमा दिली किंवा लोकांच्या मनात तसे भरवले गेले. सन १९७७ साली अनेक पक्षांचे मिळून जनता पक्ष तयार झाला आणि पुढे याच पक्षाचे भारतीय जनता पक्ष असे नाव झाले आणि पुढे हा पक्ष देशात ८० टक्के हिंदूंची बाजू घेणारा हिंदुत्ववादी आणि काँग्रेस हा २० टक्के जनतेची बाजू घेणारा धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून गणला जाऊ लागला.
आता या दोन्ही पक्षांची विचारधारा कमालीची विरोधी होती आणि या विचारधारेवरच हे पक्ष तगले. गेली कित्येक वर्षे भाजप हा जातीयवादी पक्ष समाजात जातीच्या नावाखाली दुही माजवणारा पक्ष आहे त्याच्या नादाला लागू नका असे जनतेला पटवून देण्यात काँग्रेस यशस्वी होत गेली. दुसरीकडे काश्मीर सारख्या ठिकाणी हिंदूंवर,काश्मिरी पंडीतांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार झाले, देशात हिंदूंना दाबून ठेवण्याचा प्रकार झाला. हिंदुत्ववादी म्हटलं की जातीयवाद असे नाव देऊन त्यांना गप्प बसवले जात होते. याच काळात महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी मला जातीयवादी म्हणा किंवा समाजात दुही माजवणारा म्हणा पण मी हिंदूंची बाजू घेऊनच समाजकारण करणार असा ठाम निर्धार केला आणि ते या निर्धाराच्या जोरावर हिंदुहृदयसम्राट झाले. हिंदू जनता त्यांच्याकडे आपला एक आशेचा किरण म्हणून बघू लागले आणि या जोरावर ते हिंदुहृदयसम्राटही झाले. भाजप हा पक्ष हिंदुत्ववादी व बाळासाहेब यांची शिवसेना हिंदुत्ववादी या नात्याने त्यांनी एकत्र येऊन हिंदुत्ववाद हा विचार पुढे चालवला. हळूहळू जनतेला हिंदुत्ववाद हा जातीयवाद नाही हे कळायला लागले आणि प्रेशर कुकर मध्ये जशी वाफ जितकी दाबली तितकी ती उफाळून येते त्याप्रमाणे जेवढं हिंदूंना दाबून ठेवलं तेवढी वाफ उफाळून आली आणि देशात हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाची सत्ता आली.गेली कित्येक वर्षे धर्मनिरपेक्ष किंवा हिंदुत्ववादी या मुद्यावर निवडणूका लढवल्या गेल्या.
आज आपण महाराष्ट्रातील राजकीय चित्र बघितले तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्रित सरकार आहे. म्हणजे दोन विरोधी टोकाच्या विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन बनवलेले सरकार असा आपण उल्लेख करू. लोकशाहीत सरकारला लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी बनवलेले सरकार अशी उपमा असते, मात्र येथे राजकीय पक्षांनी सत्तेसाठी एकत्र येऊन बनवलेले सरकार असा उल्लेख करता येईल. सत्तेसाठी म्हणण्याचे कारण असे की, बाळासाहेब यांची शिवसेना आणि आजची शिवसेना यात जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या पक्षाने काँग्रेस बरोबर युती करून सत्ता मिळवण्यापेक्षा मी माझा पक्ष बरखास्त करणे उचित समजेल असे ते म्हणत. दुसरीकडे काँग्रेसला सेना जातीयवादी पक्ष म्हणून
सेनेचे प्रचंड वावडे होतेच.इंदिरा काँग्रेस मधून फुटून
फुटून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तीच मुळी या हिंदुत्ववादी पक्षांना किंवा जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि ते या जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवा असेही सतत म्हणत असत नव्हे त्यांचा तो अजेंडाच होता. म्हणजे या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या विचारधारेशी प्रतारणा करून सरकार बनवले याचा अर्थ त्यांनी स्वतःच पक्षधोरण धुळीस मिळवले आहे. हिंदुत्ववादी पक्ष हिंदुत्ववादी पक्षाच्या विरोधात उभे राहिले आहे याचा अर्थ त्यांना हिंदुत्ववादाशी काही घेणं देणं नाही असा अर्थ होतो. सत्तेपुढे हिंदुत्ववाद फिका पडलेला दिसत आहे, विचारधारेवर निवडणूक लढवता येतात हा विचार मागे पडला आहे. भविष्यात विचारधारा हा प्रकार मागे पडून केवळ सत्ताप्राप्ती हे धोरण राजकीय पक्षांनी अंगिकारले तर देशात लोकशाही न राहता अराजकता माजणार आहे. लोकांच्या मताला म्हणजे बहुमताला किंमतच राहणार नाही.
प्रत्येक पक्ष हा पक्षाच्या समर्थकांच्या जोरावर चालतो त्या पक्षाच्या विचारधारेला मानणारा ठराविक वर्ग असतो.पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी असते.वेळप्रसंगी कार्यकर्ते आपल्या पक्षासाठी किंवा नेत्यांसाठी काहीही करायला तयार असतात.वेळप्रसंगी मारामाऱ्या देखील होतात.मात्र पक्षांनी विचारधारा सोडल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली आहे.नेते काहीही करो
मात्र आजही काही कार्यकर्ते आपल्या पक्षाशी किंवा विचारधारेशी बांधील आहेत, त्यांना आपल्या नेत्यांचे कृत्य पचनी पडले नसले तरीही ते विचारधारा सांभाळून आहेत असे म्हणायचे कारण असे की ते त्या पक्षात राहूनही आपल्या नेत्याला नाव ठेवताना दिसतात, मात्र त्यांनी पक्ष बदलला नाही हा आशेचा किरण आहे. म्हणजे कार्यकर्ते नावाच्या पायावर पक्ष उभे राहिले आहेत तो पाया आजही भक्कम आहे.हा पाया पक्षानी टिकवणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!