मुक्त व्यापार आणि आर्थिक विकासाचे समर्थन या गोष्टी शतकानुशतके भारतीय साहित्याचा भाग आहेत :कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने जीडीपीमध्ये वाढ दर्शवेल: – कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागाचा शताब्दीवर्ष सोहळा संपन्न

नवी दिल्ली  01 AUG 2021

आर्थिक विकासासाठी मुक्त व्यापाराला चालना आणि आणि मुक्त व्यापाराचे समर्थन या गोष्टी आपल्याला पाश्चिमात्यांनी शिकवलेल्या नसून त्या भारतीयांच्या जीवनशैलीचा गेली शतकानुशतके भाग आहेत. आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पाहतो की राजाला व्यापारावरील सर्व प्रकारची बंधने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळेच आपण आर्थिक सुधारणांच्या तत्त्वज्ञानामध्ये संपत्ती निर्माण करण्याकडे एक वरदान म्हणून पाहतो असे प्रतिपादन भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना केले. 

ते पुढे म्हणाले, आर्थिक विकास होत असताना असमानतेकडे बोट दाखवणाऱ्या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचे संकुचन झाल्याने श्रीमंतांपेक्षा मध्यमवर्गीय आणि गरिबांना जास्त त्रास झाला, हे समजून घेतले पाहिजे. यातून आपण विकासाकडे प्राधान्याने पाहिले पाहिजे हे दिसून येते. 

श्री सुब्रमण्यम पुढे म्हणाले “ज्याप्रमाणे नव्वदच्या दशकात केलेल्या सुधारणांनी वेगवान विकासाचा पाया घातला तसेच गेल्या दीड वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करता येईल”

“लोककल्याणाच्या उद्दिष्टासहित विकासावर भर हा सुधारणांच्या त्रिसूत्रीचा पहिला पाया आहे. संपत्ती निर्मितीसाठी खासगी क्षेत्राला मदत आणि संपत्ती निर्मितीकडे सकारात्मक रीतीने पाहणे हा सुधारणांच्या त्रिसूत्रीचा दुसरा पाया आहे. खाजगी गुंतवणुकीतून उत्पादनक्षमता वाढ त्यातून रोजगार निर्मिती तसेच वेतन वाढ होईल. पर्यायाने मागणीमध्ये वाढ होऊन लोकांची क्रयशक्ती वाढेल आणि या सर्वांचा परिपाक म्हणून वाढलेली मागणी बघून उद्योगांकडून आणखी गुंतवणूक असे सुचक्र तयार करणे हा सुधारणांच्या त्रिसूत्रीचा 3 रा पाया आहे, असे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार पुढे म्हणाले. 

जन धन, आधार आणि मोबाईल या JAM त्रयीमुळे सरकारी अनुदानाच्या गळतीचे प्रमाण कमी झाले आहे तसेच मनरेगाच्या फायद्यांना लाभार्थ्यांपर्यंत पोचवणे आणि लाभार्थ्यांची योग्य निवड करणे शक्य झाले आहे तसेच आर्थिक पाहणी अहवालानुसार देशभरात गेल्या काही वर्षात मूलभूत सेवांच्या पूर्ततेमध्ये सर्वत्र वाढ झालेली आहे असे श्री सुब्रमण्यम पुढे म्हणाले. 

या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, विभागाच्या संचालिका प्रा. डॉली सन्नी, प्रा. अभय पेठे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थिती होती .

पार्श्वभूमी

अर्थशास्त्र विभागाची शतकी वाटचाल

आज 1 ऑगस्ट 2021 रोजी या विभागाला 100 वर्षे पूर्ण झाली. मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी हे 20 व्या शतकातील बॉम्बे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा वारसा आहे. देशातील सर्वात जुने अर्थशास्त्राचे विभाग म्हणूनही या विभागाची ओळख आहे. देशाची आर्थिक विचारसरणी आणि धोरणनिर्मितीमध्ये या विभातील विद्वानांचा मोठा वाटा आहे. प्रा. सी. एन. वकील, प्रा. एम. एल. दांतवाला, प्रा. डी. टी. लकडावाला, आणि प्रा. पी. आर. ब्रम्हानंद यांनी या विभागाचा पाया रोवला आहे. 1963 पासून विद्यापीठ अनुदान आयोगाने या विभागाला सेंटर ऑफ एडव्हान्स स्टडीज म्हणून मान्यता दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या पारंपारिक विभागापैकी 2006 ला स्वायत्तता बहाल केलेले पहिले विभाग अशीदेखील विभागाची ओळख आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!