आपल्या भाषांचे संरक्षण करण्यासाठी सहकार्यात्मक आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांची गरज : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली 31 JUL 2021
भारतीय भाषांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचा कायापालट घडवून आणण्यासाठी सहकार्यात्मक आणि नाविन्यपूर्ण प्रयत्न गरजचे असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. भाषा जतन करणे आणि त्यांचे सातत्य सुनिश्चित करणे हे केवळ लोकचळवळीद्वारेच शक्य आहे यावर भर देताना नायडू म्हणाले की, भाषेचा वारसा आपल्या भावी पिढ्यांकडे सोपवण्याच्या प्रयत्नांमध्ये लोकांनी एकमताने आणि मोठ्या संख्येने एकत्र आले पाहिजे.
भारतीय भाषा जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध लोकाभिमुख उपक्रमांचा उल्लेख करताना उपराष्ट्रपतींनी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनुवादाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. भारतीय भाषांमधील अनुवादाचा दर्जा आणि प्रमाण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचीन साहित्य युवकांसाठी साध्या, बोली भाषांमध्ये अधिक सुलभ आणि प्रासंगिक बनवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातील आणि विविध बोलीभाषांमधील नामशेष होत आलेले आणि पुरातन शब्द भावी पिढ्यांसाठी जतन करण्यासाठी त्यांचे संकलन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मातृभाषांच्या संवर्धनाबाबत ‘तेलुगु कुटामी’ द्वारा आयोजित एका परिषदेला व्हर्च्युअली संबोधित करताना, नायडू म्हणाले की, जर एखाद्याची मातृभाषा नष्ट झाली तर त्याबरोबर त्याची स्वतःची ओळख आणि स्वाभिमान देखील नष्ट होईल.
उपराष्ट्रपती नायडू यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी 21 वर्ष जुना वैवाहिक वाद जिव्हाळ्याने सोडवताना अस्खलितपणे इंग्रजीमध्ये बोलण्यास अडचण असलेल्या महिलेला तिच्या समस्या तिच्या मातृभाषेत तेलुगूमध्ये बोलण्याची परवानगी दिली.
8 राज्यांमधील 14 अभियांत्रिकी महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून विविध भारतीय भाषांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी तांत्रिक अभ्यासक्रमांमध्ये भारतीय भाषांचा वापर देखील हळूहळू वाढवण्याचे आवाहन केले.