आयएनएस तबर या युध्दनौकेने ‘इंद्र नेव्ही-21’ या सागरी सरावात भाग घेतला

नवी दिल्ली 30 जुलै 2021

भारत आणि रशिया या देशांच्या नौदलांचा 12 वा द्वैवार्षिक द्विपक्षीय संयुक्त सागरी सराव ‘इंद्र नेव्ही -21’, 28 ते 29 जुलै 2021 या कालावधीत बाल्टिक समुद्रात पार पडला. सन 2003 मध्ये सुरु झालेला ‘इंद्र नेव्ही’ सागरी सराव दोन्ही देशांदरम्यानच्या दीर्घकालीन धोरणात्मक नातेसंबंधांचे प्रतीक आहे. नुकताच झालेला हा सराव, रशियाच्या नौदलाच्या 325 व्या नौदल दिवसानिमित्त होणाऱ्या समारंभात भाग घेण्यासाठी भारतीय नौदलाच्या आयएनएस तबर या युद्धनौकेने रशियातील सेंट पिट्सबर्गला दिलेल्या सदिच्छा भेटीचा भाग आहे. 

गेल्या काही वर्षांच्या काळात नौदलांच्या कार्यकक्षा, कार्यवाहीतील व्यामिश्रता आणि सहभागाच्या पातळीवर ‘इंद्र नेव्ही’ सराव अधिकाधिक परिपक्व होत गेला आहे. दोन्ही देशांच्या नौदलांनी गेल्या अनेक वर्षांत घडविलेले आंतर परिचालन अधिक सुसंघटीत करणे आणि बहुआयामी सागरी परिचालानांतील प्रक्रिया तसेच माहिती अधिक परिपूर्ण करणे हा या वर्षीच्या संयुक्त सागरी सरावाचा प्राथमिक उद्देश होता.

या सरावात भाग घेताना, आयएनएस तबर या  युद्धनौकेने भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व केले तर बाल्टिक ताफ्यातील आरएफएस झेलियोनी डोल आणि आरएफएस ओडीन्ट्सोव्हो या संरक्षक जहाजांनी रशियन महासंघ नौदलाचे प्रतिनिधित्व केले.

हा सराव दोन दिवस सुरु होता आणि त्यात हवाई-हल्लाविरोधी,  हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध मोहिमा, नौकांवर विमाने उतरविण्याचा सराव आणि सागरी जहाजांच्या विविध कार्यांच्या सरावाचा समावेश होता.

कोविड महामारीने निर्माण केलेल्या आव्हानात्मक परिस्थितीत देखील सुरळीतपणे झालेला ‘इंद्र नेव्ही- 21’ सराव दोन्ही देशांतील नौदलांचा परस्परांवरील विश्वास आणि आंतर-परिचालन यांच्यात अधिक मजबूती आणेल आणि दोन्ही देशांच्या नौदलांचा उत्तम प्रक्रियांमधील सहभाग शक्य करून देईल. हा सागरी सराव दोन्ही देशांच्या नौदलांमधील सहकार्य संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि या देशांदरम्यान दीर्घ काळापासून असलेला मैत्रीचा बंध अधिक बळकट करण्यासाठीच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!