तृतीयपंथीय व्यक्तीसाठी गृह सुविधा
नवी दिल्ली, 27 जुलै 2021
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठीची एक योजना बनवत असून, त्या अंतर्गत, वंचित आणि गरजू तृतीयपंथी व्यक्तीसाठी निवारा घरे तयार केली जाणार आहेत.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयने यासाठी 12 निवारा घरे प्रायोगिक स्वरूपात बांधण्याचा निर्णय घेतला असून, अशा सर्व तृतीयपंथीयांसाठी, ‘गरिमा गृह’ या नावाने निवारा घरे बांधण्यासाठी सामुदायिक क्षेत्रात करणाऱ्या संस्थाना आर्थिक निधी दिला जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु असलेली ही घरे, महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, छत्तीसगढ आणि ओडिसा या राज्यातही बांधली जात आहेत. या निवारा केंद्रांचा मुख्य उद्देश तृतीयपंथी लोकांना सन्मानाने जीवन जागता येईल, असे सुरक्षित घर बांधून देणे हा आहे. या निवारा केंद्रांमध्ये मूलभूत सोयी-सुविधा जसे की अन्न, वैद्यकीय शुश्रूषा, मनोरंजनाची साधने उपलब्ध असतील. तसेच, यात तृतीयपंथीयांसाठी क्षमता बांधणी/कौशल्य विकास कार्यक्रम देखील घेतले जातील.
केंद्र सरकार तृतीयपंथीयांसाठी कोणतीही निवृत्तीवेतन व्यवस्था चालवत नाही. मात्र, ग्रामविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम राबावला जातो. या अंतर्गत, 3,384 तृतीयपंथीयांना मासिक निवृत्तीवेतन दिले जाते. ही माहिती, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री ए नारायणस्वामी यांनी आज लोकसभेत दिली.