इंद्र-21 युद्ध सराव
नवी दिल्ली 27 JUL 2021
भारत आणि रशिया या देशांचा 12 वा संयुक्त लष्करी सराव इंद्र-21, 1 ते 13 ऑगस्ट 2021 या कालावधीत रशियामध्ये व्होल्गोग्राड येथे होणार आहे. या वेळी, आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांच्या कारवाया रोखण्यासाठी, दहशतवादविरोधी मोहिमांच्या परिचालनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या नियमावलीनुसार संयुक्तपणे काम करण्याचा सराव केला जाईल.
या युद्ध सरावात दोन्ही देशांतील 250 जवान भाग घेणार आहेत. संयुक्त सरावामध्ये सहभागी होण्याआधी, या जवानांची युध्दकौशल्ये अधिक सफाईदार व्हावीत या उद्देशाने, या सरावात भाग घेणाऱ्या भारतीय लष्कराच्या पायदळातील यांत्रिकी विभागाच्या तुकडीचे देशातील विविध ठिकाणी अत्यंत कठोर प्रशिक्षण घेण्यात आले.
इंद्र-21 युद्ध सरावामुळे भारत आणि रशिया या देशांच्या लष्करांमध्ये परस्परांवरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच आंतर-कार्यप्रणालीचे परिचालन सुधारेल आणि त्यामुळे दोन्ही देशांतील आकस्मिक गरजेच्या वेळी या देशांच्या लष्करांमध्ये अधिक उत्तम सुसंवाद राखणे शक्य होईल. हा युद्ध सराव, भारत आणि रशिया या देशांदरम्यानचे संरक्षणविषयक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा असेल आणि या देशांच्या मैत्रीच्या दीर्घकालीन नात्याला पुन्हा नवी चालना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरेल.