संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक संपन्न
सभागृहात अर्थपूर्ण चर्चा व्हावी, पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा
संसदेतील 19 सत्रांमध्ये 31 विषयांवरील सरकारी कामकाज होण्याची अपेक्षा
केंद्र सरकार नियमांच्या अधीन सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार
नवी दिल्ली, 18 जुलै 2021
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
आजच्या या बैठकीत, सर्व खासदारांनी अधिवेशनाच्या कामाकाजाविषयी अनेक महत्वाच्या सूचना दिल्या, अशाचप्रकारे, दोन्ही सभागृहांमध्ये सर्व विषयांवर अर्थपूर्ण चर्चा व्हावी, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केली. सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.
सुदृढ लोकशाहीसाठी, लोकांशी संबंधित प्रश्न विचारविनिमयातून सोडवावेत, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. केंद्र सरकारला सर्व मुद्द्यांवर उत्तर देण्याची संधी द्यायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले. विविध विषयांवर चर्चा होऊ देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष परिस्थितीची, वस्तुस्थितीची माहिती असते, त्यामुळे त्यांनी चर्चेत सहभाग घेतला तर चर्चा अधिक सकस आणि अर्थपूर्ण होते, असे मोदी म्हणाले. आता बहुतांश संसद सदस्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याचे सांगत, यामुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संसदेत सर्व विषयांवर निकोप चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, त्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. संसदेचे अधिवेशनातील कामकाज सुरळीत चालेल आणि ते यशस्वीरित्या पूर्ण होईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोविड महामारीत प्राण गमावलेल्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी झाले होते. केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि व्ही मुरलीधरन देखील यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकार नियमांच्या अधीन राहून कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, असे बैठकीच्या सुरुवातीलाच, जोशी यांनी सांगितले. सर्व पक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोणत्याही मुद्दयांवर, बांधीव मुद्देसूद चर्चा आणि वादविवाद व्हायला हवेत असेही ते म्हणाले/ या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात उद्या म्हणजेच 19 जुलैपासून होणार असून, अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालेल, अये त्यांनी सांगितले. संसदेची एकूण 19 सत्रे होण्याची अपेक्षा असून त्यात, 31 सरकारी कामकाजांचा समावेश असेल. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जाईल.