स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्सवाचा भाग म्हणून, PMAY-U या योजनेअंतर्गत, ‘खुशियों का आशियाना’ या लघुपट स्पर्धेचे आयोजन, 18 वर्षांवरच्या सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली स्पर्धा
सर्वांसाठी घर’ या उपक्रमावर चर्चा आणि जनजागृतीच्या उद्देशाने, विविध हितसंबंधी घटकांच्या सहभागासह ‘आवास पर संवाद’ या राष्ट्रव्यापी परिसंवादाचेही आयोजन
नवी दिल्ली 17 JUL 2021
प्रधानमंत्री आवास योजना-नागरी (PMAY-U), परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठीची जगातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या प्रसार-प्रचारासाठी, दोन अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात, ‘खुशियों का आशियाँना’ ही लघुपट स्पर्धा-2021 आणि ‘आवास पे संवाद’ ही 75 परिसंवाद आणि कार्यशाळांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधानांचे ‘सर्वांसाठी घर’ हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरणार आहेत.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने 25 जून 2021 रोजी, म्हणजेच PMAY-U च्या सहाव्या वर्धापनदिनी या उपक्रमांची घोषणा केली होती. या वर्धापन दिनीच, या योजनेने एक मैलाचा दगड पार केला होता. मिशनसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या एकून निधीने, एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. या योजनेअंतर्गत एकूण 1.12 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी 83 लाख घरांचा पाया तयार असून, 50 लाखांपेक्षा अधिक घरे बांधून पूर्ण झाली आहेत.
हे दोन्ही उपक्रम एक आव्हान आणि स्पर्धा म्हणून राबवले जाणार असून, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या देशव्यापी कार्यक्रमाचा भाग म्हणून इतर अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त केंद्र सरकारने हा विशेष कार्यक्रम सुरु केला आहे.
या दोन्ही उपक्रमांसाठीची प्रमाणित कार्यान्वयन पद्धती देखील जारी करण्यात आली आहे.
लघुपट स्पर्धेसाठी PMAY-U योजनेचे लाभार्थी, युवक, समाजातील सदस्य, संस्था तसेच वैयक्तिक/सामूहिक गट यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यात, PMAY-U योजनेचा सहा वर्षांचा प्रवास आणि या योजनेमुळे लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला आहे, त्यांच्या आयुष्यात प्रतिष्ठा वाढली का, ते अधिक सक्षम झाले आहेत, यावर प्रकाश टाकणारा लघुपट तयार करायचा आहे. ही स्पर्धा, 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांसाठी खुली आहे. एक सप्टेंबर पर्यंत लघुपट सादर करायचे आहेत. या स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर, 2021 रोजी जाहीर केला जाईल. प्रत्यके गटातल्या 25 विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे. तीन श्रेणीत हे पुरस्कार दिले जाणार असून, पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे, 25000, 20000 आणि 12500 रुपयांची बक्षिसे आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत
‘आवास पर संवाद’ या मालिकेचा उद्देश, या योजनेविषयी जनजागृती करण्यासाठी चर्चा आणि परिसंवाद घडवून आणणे तसेच ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेशी सबंधित सर्व हितसंबंधीयांदरम्यान चर्चा घडवून आणणे हा आहे. यात, अभियांत्रिकी क्षेत्र, नागरी समुदाय विकास, नियोजन, वित्त इत्यादी क्षेत्रातील प्रतिनिधी असतील. देशभरात एक जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान अशा 75 कार्यशाळा आणि परिसंवाद होणार होत आहेत. राज्य सरकारच्या सहाय्याने शिक्षणसंस्था आणि प्राथमिक पतसंस्था हे उपक्रम राबवत आहेत. या कार्यशाळा, कोविड नियमांचे पालन करुन प्रत्यक्षात म्हणजेच ऑफलाईन स्वरूपात भरावल्या जातील किंवा मग ऑनलाईन घेतल्या जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला, मंत्रालयाकडून, एक प्रमाणपत्र दिले जाईल.
या अंतर्गत सुरु असलेल्या सर्व उपक्रमांना लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने नोंदणी सुरु आहे. या अंतर्गत, कार्यशाळा आयोजित करण्यासाठी, शैक्षणिक संस्था आणि पीएलआय PMAY (U) चे संकेतस्थळ, : https://pmay-urban.gov.in/ आणि PMAY-U च्या मोबाईल एपवर नोंदणी करता येईल.
PMAY-U योजनेअंतर्गत, सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याचा आणि या प्रक्रियेत सर्व हितसंबंधी घटकांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या दोन उपक्रमांच्या माध्यमातूनही लोकांच्या स्वतःच्या मालाकीच्या पक्क्या घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची कथा, त्यासाठी त्यांनी केलेले संघर्ष, घर मिळाल्यानंतरचा त्यांचा आनंद आणि त्यांच्या भावपूर्ण प्रवासाचे वर्णन या लघुपटांमधून पुढे येणार आहे.