रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यक्रमात रेल्वेची उल्लेखनीय प्रगती
नव्याने विकसित झालेल्या गांधीनगर रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकाचादेखील कायापालट होणार
नवी दिल्ली, 15 जुलै 2021
भारतीय रेल्वेने स्थानक पुनर्विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मोठी झेप घेतली असून पुनर्विकास झालेले गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानक देशाला आधुनिक सेवा देण्यासाठी सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, नव्याने विकसित झालेल्या गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करणार आहेत. गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास शहरासाठी प्रोत्साहक म्हणून काम करेल आणि गुंतवणूकीचे चक्र, रोजगाराच्या संधी निर्माण करेल तसेच एकंदरच गुजरात राज्याची राजधानी असलेल्या गांधीनगरची अर्थव्यवस्था सुधारेल.
गुजरात सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त भागीदारीतून आयआरएसडीसी (भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळ) यांच्या मार्फत स्थापन करण्यात आलेल्या जीएआरयूडी (गांधीनगर रेल्वे आणि शहरी विकास महामंडळ) या संयुक्त उपक्रम कंपनीचा हा एक अनोखा प्रकल्प आहे
भारतातील हा अशाप्रकारचा पहिलाच प्रकल्प असून यामुळे मुंबई आणि बंगळुरूसारख्या शहरांमध्येही रेल्वेस्थानक विकासाचा मार्ग होणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, 125 स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. यापैकी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाकडून 63 स्थानकांवर काम सुरु आहे , तर रेल्वे भूमी संपादन प्राधिकरणाकडून 60 स्थानकांवर काम सुरु आहे. आणि दोन स्थानकांवर विभागीय रेल्वेकडून कार्य सुरु आहे. बांधकाम विकासासह 123 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी एकूण गुंतवणूक 50,000 कोटींपेक्षा जास्त आहे.
नव्याने विकसित झालेल्या गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्थानकाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे:
- तिकीट सुविधेसह प्रशस्त प्रवेश कक्ष
- आकर्षक बाह्य दर्शनी भाग
- संकल्पना -आधारित प्रकाशयोजना
- थेट प्रक्षेपण आणि प्रदर्शन कक्ष असलेलया एलईडी वॉल सह विशेष समर्पित कलादालन
- मध्यवर्ती वातानुकूलित बहुउद्देशीय प्रतीक्षा कक्ष
- सरकते जिने आणि उद्वाहक तसेच दिव्यांगजनांसाठी सोयीसुविधा
- सर्वधर्मीय प्रार्थना सभागृह
- बालकांना आहार भरविण्यासाठी वातानुकूलित कक्ष
- सुमारे 500 प्रवाशांसाठी रेल्वे फलाटावर प्रतीक्षा सभागृह
- पार्किंगच्या पुरेशा सुविधांसह सब-वे शी फलाटांची उत्तमप्रकारे जोडणी
रेल्वेस्थानक पुनर्विकास हे रेल्वे मंत्रालयाचे प्राधान्य क्षेत्र आहे
प्रकल्प कार्यान्वित
1. गांधीनगर (गुजरात)
2. हबीबगंज (भोपाळ)
3. बंगळुरू येथील एसएमव्हीटी
प्रगतीपथावर –
अयोध्या
बिजवासन (दिल्ली)
गोमतीनगर (लखनौ )
दिल्ली सफदरजंग
अजनी (नागपूर)