जागतिक युवा कौशल्यदिन कार्यक्रमास पंतप्रधानांनी केले संबोधित
नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज आणि आत्मनिर्भर भारताचा हा पाया : पंतप्रधान
कौशल्याचा उत्सव हा आपल्या संस्कृतीचा भाग : पंतप्रधान
समाजातील कुशल कामगारांच्या सन्मानार्थ आवाहन
1.25 कोटींपेक्षा अधिक युवकांना `प्रधानमंत्री कुशल विकास योजना` प्रशिक्षण : पंतप्रधान
आपल्या युवकांना कुशल बनविण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून भारताने स्मार्ट आणि कुशल मनुष्यबळाचा पर्याय जगाला उपलब्ध करून दिला आहे : पंतप्रधान
महामारीच्या विरुद्ध लढताना भारताच्या कुशल मनुष्यबळाने परिणामकारक सहकार्य केले : पंतप्रधान
कुशलतेची मोहीम, पुनर्कौशल्य, आणि युवकांचे कौशल्य वाढविण्याची मोहीम अविरतपणे पुढे गेली पाहिजे : पंतप्रधान
कमकुवत घटकांना कुशल बनवित कौशल्य भारत अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करीत आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली 15 JUL 2021 –
नवीन पिढीचा कौशल्य विकास ही राष्ट्रीय गरज आहे आणि आत्मनिर्भर भारताचा हा पाया आहे, कारण ही पिढी आपले प्रजासत्ताक 75 वर्षाकडून 100 वर्षांपर्यंत वाटचाल करीत घेऊन जाणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. गेल्या 6 वर्षातील नफ्याचे भांडवल करून घेत कौशल्य भारत अभियानाला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान बोलत होते.
पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीतील कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आणि कौशल्य विकासाला दिले जाणारे महत्त्व आणि `अप-स्किलिंग` आणि समाजातील प्रगती यांच्यातील दुवा यावर त्यांनी भर दिला. विजयादशमी, अक्षय्य तृतीया आणि विश्वकर्मा पूजन अशा कौशल्यांचा उत्सव भारतीय साजरा करतात, ज्यामध्ये कौशल्य आणि व्यावसायिक अवजारांची पूजा केली जाते. या परंपरांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सुतार, कुंभार, धातू कामगार, स्वच्छता कामगार, फलोत्पादन कामगार आणि विणकर अशा कुशल व्यवसायांचा योग्य सन्मान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधानांनी असेही नमूद केले की, गुलामगिरीच्या दीर्घ काळामुळे आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रणालीतील कौशल्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
पंतप्रधानांनी याकडेही लक्ष वेधले की, जेव्हा शिक्षण आपल्याला काय करावे, हे शिकविते, तर कौशल्य आपल्याला प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी कशी केली जावे हे शिकविते आणि हेच आपल्या कौशल्य भारत अभियानाचे मार्गदर्शक तत्त्व आहे. `प्रधानमंत्री कुशल विकास योजना` अंतर्गत 1.25 कोटी पेक्षा अधिक युवकांनी प्रशिक्षण घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
आपल्या दैनंदिन जीवनात कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधान म्हणाले की, अर्थार्जनामुळे शिक्षण थांबू नये. आजच्या जगात केवळ कौशल्य असलेली व्यक्ती मोठी होऊ शकते. ही बाब लोकांना आणि देशांना या दोघांनाही लागू पडते. ते म्हणाले की, भारत स्मार्ट आणि कुशल मनुष्यबळाचा पर्याय जगाला देत आहे, जो आपल्या युवकांना कुशल बनविण्याच्या योजनेचा एक भाग आहे. त्यांनी जागतिक कौशल्य आराखड्याच्या टप्प्यांचे कौतुक केले आणि भागधारकांना सातत्याने कौशल्य असणे, पुनर्कौशल्य आणि कुशलता वाढविणे यासाठी उद्युक्त केले. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे रि-स्किलिंगची मोठी मागणी असणार आहे, त्यामुळे ते त्वरेने वाढविणे आवश्यक आहे. महामारीच्या विरुद्ध प्रभावी लढा देण्यासाठी कुशल मनुष्यबळाने कशाप्रकारे सहकार्य केले, याचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला.
पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला, ज्यांनी दुर्बल घटकांना कुशल करण्यावर भर दिला होता. मोदी म्हणाले की, कौशल्य भारत अभियानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा देशाचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ, `गोईंग ऑनलाइन ॲज लीडर्स – GOAL` हे आदिवासी समाजात आदिवासींना कला व संस्कृती, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि डिजिटल साक्षरता यासारख्या आदिवासी भागातील उद्योजकतेच्या विकासासाठी मदत करीत आहे. तसेच, वन धन योजना देखील आदिवासी समाजाला नवीन संधी उपलब्ध करून देण्यात प्रभावी ठरली आहे. पंतप्रधानांनी समारोप करताना सांगितले की, “येत्या काही दिवसांत, आपल्याला अशा काही मोहिमा अधिक व्यापक करून कौशल्याच्या माध्यमातून स्वतःला आणि देशाला आत्मनिर्भर करायचे आहे.“