केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी भीम-यूपीआय अॅपच्या भूतानमधील परिचालनाला संयुक्तपणे सुरुवात केली

नवी दिल्‍ली, 13 जुलै 2021

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी आज दुपारी झालेल्या आभासी कार्यक्रमात भ भीम-यूपीआय अॅपच्या भूतानमधील परिचालनाला संयुक्तपणे सुरुवात केली. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत किसनराव कराड, भुतान रॉयल वित्तीय प्राधिकरणाचे गव्हर्नर दाशो पेनजोरे, आर्थिक सेवा विभागाचे सचिव देबाशिष पांडा, भूतानमधील भारतीय राजदूत रुचिरा कंबोज, भूतानचे भारतातील राजदूत जनरल व्ही.नामग्याल आणि एनपीसीआय अर्थात भारतीय राष्ट्रीय भरणा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप असबे उपस्थित होते. 

या प्रसंगी बोलताना  सीतारामन म्हणाल्या की, भारताच्या नेबरहूड फर्स्ट अर्थात शेजाऱ्यांना प्राधान्य या धोरणाअंतर्गत भूतानमध्ये या सुविधेची सुरुवात करण्यात आली आहे.कोविड-19 महामारीच्या काळात  भारतात डिजिटल पद्धतीने यशस्वीपणे पैशांचे व्यवहार करण्याच्या क्षेत्रात भीम-यूपीआय अॅपचे मोठे योगदान आहे आणि गेल्या 5 वर्षांत 10 कोटीपेक्षा जास्त यूपीआय क्यूआर नोंदण्यात आले तसेच भीम-यूपीआय अॅपच्या माध्यमातून 2020-21 मध्ये 41 लाख कोटी रुपये मूल्याचे 22 अब्ज आर्थिक व्यवहार करण्यात आले.  

भूतानचे अर्थमंत्री ल्योनपो नामग्ये त्शेरिंग यांनी भीम-यूपीआय अॅप सेवा  भूतानमध्ये सुरू केल्याबद्दल भारत सरकारचे कौतुक करून आभार मानले आहेत. प्रत्येक सरत्या दिवसासोबत,या दोन्ही देशांमधील बंध अधिकाधिक दृढ होत गेले आहेत असेही ते पुढे म्हणाले. 

भीम-यूपीआय अॅप सेवा भूतानमध्ये सुरु झाल्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2019 सालच्या भूतान भेटीदरम्यान दोन्ही देशांनी याबाबतीत एकमेकांना दिलेल्या वचनाची पूर्ती झाली आहे. पंतप्रधानांच्या या भेटीनंतर लगेचच भारत आणि भूतान या दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या रूपे कार्डच्या वापराला स्वीकृती देण्यात येऊन त्यांचा वापर यापूर्वीच सुरु झाला आहे. 

क्यूआर वापरासाठी  यूपीआय प्रमाणकांचा स्वीकार करणारे तसेच भीम अॅपच्या माध्यमातून मोबाईल-आधारित पैशांचे व्यवहार करण्याची यंत्रणा स्वीकारणारे  शेजारी राष्ट्रांमधील भूतान हे पहिले राष्ट्र आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!