महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्तन बदलाच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर. लसीकरणानंतरही कोविड प्रतिबंधक उचित वर्तनाच्या पालनाची निकड असल्याचे प्रतिपादन. समाजातील काही घटकांमधे लसीबाबत असलेला संकोच दूर करण्याचे आवाहन. “कोथा (कोरोना) कथालू”, या प्रख्यात लेखकांच्या 80 तेलगू लघुकथांच्या संग्रहाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते आभासी प्रकाशन
नवी दिल्ली, 10 जुलै 2021
लोकांमधील काही घटकांमधे लसीबाबत असलेला संकोच दूर करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम वैंकया नायडू यांनी आज केले. तसेच कोविड-19 बाबत खोटया बातम्या रोखण्यासाठी आणि मिथके दूर करण्यासाठी ठोस प्रयत्नांची निकड त्यांनी अधोरेखित केली.
कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जाणे ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले.
विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर्स आणि इतरांनी जनजगृतीच्या माध्यमातून भीती दूर करत लसीकरणाचे महत्व लोकांना पटवून द्यावे असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
भारत जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान राबवत असल्याचे नमूद करत, प्रत्येक भारतीयाने लस घेणे तसेच इतरांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे ही सामाजिक जबाबदारी आहे यावर नायडू यांनी भर दिला. लसीकरण अभियान जनआंदोलन व्हायला हवे, आणि तरुणांनी त्याचे नेतृत्व करावे असे ते म्हणाले.
“कोथा (कोरोना) कथालू” या जगभरातील प्रख्यात लेखकांच्या 80 तेलगू लघुकथांच्या संग्रहाचे नायडू यांनी आज आभासी माध्यमातून प्रकाशन केले. महामारीवर मात करण्यासाठी लोकांनी पंचसुत्रीचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. यानुसार सक्रीय जीवनशैलीसाठी नियमित शारिरीक व्यायाम किंवा योग, अध्यात्मिक साधनेतून शांततेची अनुभूती, पौष्टिक, आरोग्यदायी आहार, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राखणे आणि नियमित हात धुणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक वर्तनाचा अवलंब तसेच निसर्ग सुसंगत वर्तन यांचा यात समावेश आहे. या बरोबरच महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्तन बदलाच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी भर दिला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वैज्ञानिक, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि इतरांनी वठवलेल्या अमूल्य भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली.
सार्वजनिक आरोग्याचा विचार करता मानसिक आरोग्याचे महत्व त्यांनी नमूद केले. महामारीच्या पार्श्वभूमीवर त्यावर सर्वसमावेशक काम करायला हवे. संतुलित जीवनासाठी ध्यान आणि अध्यात्म सहाय्यभूत ठरेल असे ते म्हणाले.
महामारीच्या पार्श्वभूमीवर वैयक्तीक स्वच्छतेचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. लस घेतल्यानंतरही खबरदारीचे नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.
यावेळी नायडू यांनी प्रख्यात गायक दिवंगत श्री एस पी बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली. हे पुस्तक बालसुब्रमण्यम यांना समर्पित केले आहे.
श्री एस पी बालसुब्रमण्यम यांनी आपल्या पाच दशकांच्या सांगितीक प्रवासात संगीत जगतावर अमिट छाप सोडल्याचे सांगत या महान गायकाच्या आठवणींना नायडू यांनी उजाळा दिला.
आपल्या प्रादेशिक आणि मातृभाषांचे जतन करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी या पुस्तकासाठी लेखक तसेच प्रकाशकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले. माध्यमिक शिक्षणापर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषेत असायला हवे असेही ते म्हणाले.