ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जनरल व्ही.के. सिंग यांनी राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला

नवी दिल्ली, 9 जुलै 2021

ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी आज नागरी उड्डाण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. एका ट्विटमध्ये सिंदिया म्हणाले, “नागरी उड्डाण मंत्रालयाची सूत्रे हरदीप एस पुरी यांच्याकडून घेताना आनंद झाला. माझे कर्तव्य मनापासून निष्ठेने पार पाडण्याचा आणि त्यांनी हाती घेतलेले चांगले कार्य पुढे सुरु ठेवण्याचा मी संकल्प करतो.”

माजी नागरी उड्डाण मंत्री आणि विद्यमान गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप एस पुरी आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2007-2009 या काळात दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून, 2009 ते 2012 पर्यंत वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री आणि नंतर 2012 ते 2014 ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. मध्य प्रदेशातून ते चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते आणि आता राज्यसभेचे सभासद म्हणून त्यांचा हा पहिलाच कार्यकाळ आहे. सिंदिया वित्त, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण, शिक्षण, महिला, मुले, युवक व क्रीडा संबंधी स्थायी समिती तसेच अनुमान, याचिका व विशेषाधिकार समितीचे सदस्य आणि गृह मंत्रालय सल्लागार समितीचे सदस्य होते.

शैक्षणिक पार्श्वभूमी बाबत सांगायचे तर सिंदिया हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून मास्टर्स ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) केले आहे.

जनरल (सेवानिवृत्त) डॉ. विजय कुमार सिंह यांनी आज सकाळी नागरी उड्डाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. मे 2014 मध्ये लोकसभेवर निवडून आल्यानंतर व्ही. के. सिंग यांनी केंद्र सरकारमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मे, 2019 मध्ये सिंग लोकसभेवर पुन्हा निवडून गेले आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!