अयोध्या विकास प्रकल्पाचा पंतप्रधानांनी घेतला आढावा. एक आध्यात्मिक केंद्र, जागतिक पर्यटन केंद्र आणि एक शाश्वत स्मार्ट सिटी म्हणून अयोध्येचा विकास केला जाणार. आपल्या परंपरांचे सर्वोत्तम प्रकट स्वरूप आणि विकासातून झालेल्या परिवर्तनाचे सर्वोत्कृष्ट प्रतीक म्हणून अयोध्या साकारली जावी: पंतप्रधान. अयोध्येतील मानवी मूल्यांना भविष्यातील पायाभूत सुविधांशी जोडणे सर्वांसाठीच लाभदायक ठरेल: पंतप्रधान. आयोध्येला विकासाची नवी झेप घेण्यासाठी या प्रगतीची गती कायम ठेवली जावी: पंतप्रधान. अयोध्येच्या विकासकामात लोकसहभाग; विशेषतः युवकांचा सहभाग महत्वाचा: पंतप्रधान

नवी दिल्ली 26 JUN 202

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येच्या विकासप्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी उत्तरप्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी अयोध्येच्या विकासाशी संबंधित विविध पैलूंवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण केले.

देशातील एक महत्वाचे आध्यात्मिक केंद्र, जागतिक पर्यटनाचे केंद्र आणि शाश्वत स्मार्ट सिटी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनातून अयोध्येचा विकास केला जात आहे.

अयोध्येला जाण्यासाठीचे सर्व वाहतुकीचे मार्ग सुलभ सुकर व्हावेत, या दृष्टीने प्रस्तावित भविष्यातील प्रकल्पांची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली. विमानतळ बांधणी, रेल्वेस्थानकाचा विस्तार, बस स्थानक, रस्ते आणि महामार्ग या सर्वांविषयी यावेळी चर्चा झाली.

एक ग्रीनफिल्ड नगर देखील अयोध्येत विकसित केले जात आहे, ज्यात भक्तांसाठी निवासाची व्यवस्था, आश्रम, मठ यांच्यासाठी जागा, हॉटेल्स, विविध राज्यांची भवने उभारली जाणार आहेत. एक पर्यटन सुविधा केंद्र आणि जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय देखील इथे उभारले जाणार आहे.

शरयू नदी आणि तिच्या घाटांच्या परिसरात पायाभूत सुविधांच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच शरयू नदीवर क्रुझची देखील व्यवस्था केली जाणार आहे.

त्याशिवाय, सायकलस्वार आणि पायी चालणाऱ्या लोकांसाठी देखील रस्त्यांवर पुसेशी मोकळी जागा ठेवण्याचे नियोजन, विकास आराखड्यात करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी पायाभूत तंत्रज्ञानाचा वापर करून, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले जाणार आहे.

अयोध्या शहर प्रत्येक भारतीयाच्या सांस्कृतिक मनःपटलावर कोरले गेले आहे. आपल्या समाजातील परंपरा, आणि विकासाच्या मार्गाने झालेले आमूलाग्र परिवर्तन या दोन्हीचे प्रतिबिंब अयोध्येत दिसेल, असा तिचा विकास करावा, असे पंतप्रधान म्हणाले.

अयोध्या हे आध्यात्मिक केंद्र आहे त्याचवेळी त्याला भव्य परंपराही आहे. या शहरातील आध्यात्मिक मानवी मूल्यांची आपल्या भविष्यातील आधुनिक पायाभूत सुविधांशी योग्य सांगड घालणे, इथे येणारे भाविक आणि पर्यटक दोघांसाठीही फायद्याचे ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

येणाऱ्या पिढ्यांना, त्यांच्या आयुष्यात एकदा तरी हे शहर बघण्याची इच्छा व्हायला हवी, असे पंतप्रधान म्हणाले.

अयोध्या शहरातील विकासकामे नजिकच्या भविष्यात पूर्ण करण्याचे काम सुरुच राहील. त्यासोबतच, आयोध्येला, प्रगतीची नवी झेप घेण्याच्या मार्गाची गती कायम ठेवली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. अयोध्येची ओळख कायम ठेवण्यासाठी, त्याची सांस्कृतिक गतीमानता जोपासणे अत्यंत महत्वाचे आहे, आणि त्यासाठी आपण अभिनव मार्ग शोधायला हवेत, अशी सूचना पंतप्रधानांनी केली.

ज्याप्रकारे प्रभू रामचंद्रांनी सर्वांना एकत्र आणले होते, त्यांच्याच आशीर्वादाने, अयोध्येतील विकासकामे उत्तम लोकसहभागातून साकारली जावीत, विशेषतः त्यात युवकांचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत. या शहराच्या विकासासाठी, आपल्या युवकांच्या बुद्धीकौशल्याचा वापर केला जावा, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा तसेच इतर मंत्री उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!