केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सिंधू भवन रोड येथे रोप लावून अहमदाबाद मधील वृक्षारोपण कार्यक्रमांना प्रारंभ, विविध नऊ ठिकाणी झाले वृक्षारोपण
नवी दिल्ली, 21 जून 2021
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज अहमदाबाद येथे गांधीनगर लोकसभा मतदारसंघाच सिंधू भवन रोड येथे रोप लावून वृक्षारोपण कार्यक्रमांना प्रारंभ करण्यात आला. विविध नऊ ठिकाणी हा वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या समारंभप्रसंगी बोलताना अमित शहा म्हणाले, वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा लहान स्वरूपात आहे मात्र त्याचा प्रभाव आणि परिणाम इतका व्यापक आहे की येणाऱ्या अनेक पिढ्यांना यामुळे निरोगी आणि दीर्घायुष्य मिळते. जर झाडांची काळजी घेतली गेली नाही, तर पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते.
अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी मोहीम सुरू केली आणि सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासह अनेक मोहिमा राबविल्या. शहा म्हणाले की, गेल्या सात वर्षात, भारताने सौरऊर्जा क्षेत्रात आणि पवन ऊर्जा क्षेत्रात बरेच काम केले आहे, ज्यामुळे जगात पाचव्या क्रमांकावर आपले स्थान मिळविले आहे.
अमित शहा म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी देशातील 14 कोटी लोकांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर पोहोचवून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचेच काम केले आहे. या बरोबरच, वीजेची बचत करणाऱ्या दिव्यांचे मोठ्या प्रमाणात वितरण देखील मोदी सरकारने केले आहे.