कोरोना महामारीने ग्रस्त जगामध्ये योग एक आशेचा किरण बनला आहे: पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन.कोरोनाविरुद्धच्या लढाईत आघाडीवरील कोरोना योद्ध्यांनी संरक्षक कवच म्हणून योगाचा वापर केला: पंतप्रधान
नवी दिल्ली 21 JUN 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने महामारीच्या काळात योगाने पार पाडलेल्या भूमिकेबद्दल विचार मांडले. या कठीण काळात योग हा लोकांसाठी सामर्थ्य आणि संयम यांचा मोठा स्त्रोत बनून राहिला आहे असे ते म्हणाले. जगातील अनेक देशांच्या संस्कृतीमध्ये योग हा अविभाज्य घटक म्हणून अंतर्भूत नसल्यामुळे महामारीच्या काळात अनेक देशांतील जनतेला योग दिनाचे विस्मरण होणे साहजिक आहे, पण त्याऐवजी योगाबद्दल जगात असलेली उत्सुकता वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
प्रतिकूल परिस्थितीमध्ये धैर्य राखायला मदत करणे हा योगाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा जगात महामारीची सुरुवात झाली तेव्हा तिच्याशी लढण्यासाठी क्षमता, स्त्रोत आणि मानसिक खंबीरतेच्या बाबतीत कोणीही तितकेसे सज्ज नव्हते. संपूर्ण विश्वात पसरलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक विश्वास आणि सामर्थ्य गोळा करण्यासाठी योगसाधनेने लोकांना मदत केली, असे त्यांनी सांगितले.
आघाडीवरील कोरोना योद्ध्यांनी कशा प्रकारे त्यांचे संरक्षक कवच म्हणून योगाचा वापर केला आणि योगसाधनेच्या माध्यमातून स्वतःला कसे मजबूत करून घेतले आणि कोरोना विषाणूचे रुग्णांवरील दुष्परिणाम कमी करण्यासाठी डॉक्टर्स आणि परिचारिकांनी योगाची कशा प्रकारे मदत घेतली, याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. रुग्णांसाठी डॉक्टर्स आणि परिचारिकांनी रुग्णालयांमध्ये योग सत्रांचे आयोजन केल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडलेल्या दिसून आल्या. आपली श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी प्राणायाम तसेच अनुलोम-विलोम यासारख्या श्वसनाच्या व्यायामाचे महत्त्व अनेक तज्ञ सर्वांना अधोरेखित करून सांगत आहेत याचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी केला.