जगाच्या कानाकोपऱ्यात योगशास्त्र पोहचेल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत : पंतप्रधान
नवी दिल्ली 21 JUN 2021–
योगाचार्य, योगप्रचारक आणि योगाभ्यासाशी संबंधित प्रत्येकाने योगशास्त्र, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सातव्या जागतिक योगदिनानिमित्त त्यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला.
आपल्या भाषणात भगवद्गीतेतील वचन उद्धृत करत ते म्हणाले की योगामध्ये सर्व समस्यांचे समाधान आपल्याला सापडते, त्यामुळेच, आपण योगाभ्यासाचा हा एकत्रित प्रवास असाच निरंतर सुरु ठेवायला हवा.
योगाभ्यासात लोकांची रुची वाढत असून हे शास्त्र आता लोकप्रिय होत असल्याचे नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की योगशास्त्राची मूलभूत सूत्रे आणि गाभा कायम ठेवत, हे शास्त्र प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवणे अत्यंत महत्वाचे आहे. योगाचार्य आणि आपण सर्वांनीच या कामात आपले योगदान देऊन, योग समस्त लोकांपर्यंत पोचवायला हवा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.