‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेमागे देशातील निर्यात वाढवून आयातीसाठी भारतीय पर्यायांचा विचार आवश्यक ही भावना: नितीन गडकरी
नवी दिल्ली 20 JUN 2021
देशातून होणारी निर्यात वाढवून आयातीसाठी भारतीय पर्यायांचा विचार करणे आवश्यक असल्याची भावना ‘आत्मनिर्भर भारत’ या विचारामागे आहे असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग, आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते ‘व्हिजन इंडिया’ या विषयावर रोटरी जिल्हा परिषद 2020-21 (DISCON’21) ला संबोधित करत होते. गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने येत्या पाच वर्षात भारताला 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. ‘सबका साथ सबका विकास’ हे तत्त्व आणि सक्रिय सहभाग या मार्गाने गुंतवणूक, आर्थिक विकास आणि अधिकाधिक रोजगार संधी हे लक्ष्य सरकार साधत आहे. सर्वसमावेशक व लवचिक तसेच कालबद्ध निर्णय प्रक्रिया, पारदर्शक आणि विकासाभिमुख वातावरण यांच्यायोगे सुखी, समृद्ध, मजबूत आणि आत्मनिर्भर भारत आकाराला येईल असे गडकरी यावेळी म्हणाले.
पेट्रोल तसेच डिझेलला किफायतशीर आणि उत्तम पर्याय असणाऱ्या इथेनॉल आणि जैवइंधनाची गडकरी यांनी यावेळी तरफदारी केली. ऊर्जा आणि वीज यांचा विचार करता शेतीत फेरबदल करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात घट होऊन शेतकऱ्यांना मालाची उत्तम किंमत मिळेल तसेच देशभरात शेती आधारित उद्योग निर्माण होतील, असे ते म्हणाले. सेंद्रिय शेतीची गरज व्यक्त करताना गडकरी यांनी भारताने जगभरात शेती उत्पादने निर्यात करायला हवीत असे सांगितले.
भारतात तांदूळ, मका साखर आणि गहू यांचे प्रचंड उत्पादन झाल्यामुळे इथेनॉल तसेच जैव इंधनाला प्रोत्साहन दिल्यास भारतीय अर्थव्यवस्थेला झेप घेता येईल असे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मेक इन इंडिया’ ला प्रोत्साहन, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच संशोधन आणि उद्योग-सुलभता यासाठी सरकार काम करत आहे असे त्यांनी नमूद केले. आठ दहा दिवसात वाहन क्षेत्राला फ्लेक्स इंजिन बनवणे बंधनकारक केले जाईल असेही त्यांनी सांगितले. वाहन वापरासाठी शंभर टक्के पेट्रोल किंवा शंभर टक्के इथेनॉल वा जैव इंधनावर चालणारी वाहने हे पर्याय ग्राहकाला उपलब्ध असतील. इथेनॉल हे इंधन त्याचे आयातक्षम पर्याय किफायतशीरपणा, प्रदूषणविरहितता आणि देशांतर्गत उपलब्धता या गोष्टी लक्षात घेता पेट्रोलपेक्षा किफायतशीर इंधन आहे, असे ते म्हणाले.
पुढील पाच वर्षात अजून पाच कोटीं रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने समोर ठेवले आहे असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
आपल्याला लाइफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कार दिल्याबद्दल भाषणाच्या शेवटी त्यांनी रोटरीचे आभार मानले.