गुगल आणि फेसबुकसह बड्या टेक कंपन्यांवर एलन मस्क यांची टीका
नवी दिल्ली,
गुगल आणि फेसबुकसह बड्या टेक कंपन्यांवर एलन मस्क यांनी टीका केली आहे. त्यांनी या टेक कंपन्यांवर एका टिवटला रिप्लाय करताना निशाणा साधला. गुगल, फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्या असे ठिकाण आहे, जिथे तरुणांची प्रतिभा मरते, असे वक्तव्य एलन मस्क यांनी केले आहे. मस्क यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गुगलवर निशाणा साधत जेडी रॉस नावाच्या टिवटर वापरकर्त्याने म्हटले होते की, गूगलची सर्वात मोठी वाईट गोष्ट म्हणजे ते 22 वर्षांच्या हुशार तरुणांना मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणारे महत्त्वाकांक्षी संस्थापक बनवण्याऐवजी करिअरिस्ट बनवतात.
मस्क याच टिवटला उत्तर देताना म्हणाले, मोठ्या टेक कंपन्या अशा ठिकाणांमध्ये बदलल्या आहेत, जिथे तरुणांची प्रतिभा मरते. दरम्यान, त्यांच्या या टिवटनंतर अनेक युजर्सनी त्यांना विचारले की टेस्ला या कंपन्यांपेक्षा अशा कोणत्या वेगळ्या गोष्टी करत आहे आणि तरुणांमधील प्रतिभा मरत नाही याची खात्री कशी करत आहे?, असा सवाल केला. तर काही युजर्सनी गुगलची बाजू घेतली. तर एक युजर म्हणाला, करियर करण्यासाठी आणि लवकर पैसे कमवण्यासाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी गुगल हे एक उत्तम ठिकाण आहे.
गुगल, अमेझॉनसह इतर बड्या टेक कंपन्यांवर एलन मस्क यांनी टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वी अनेक वेळा त्यांनी गुगल, फेसबुक आणि अमेझॉनवर निशाणा साधला आहे. अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर त्यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याविरोधात त्यांचे मत व्यक्त केले होते. तर मस्क यांनी अॅमेझॉनला एकदा कोरोना व्हायरस विषयीच्या पुस्तकाच्या प्रकाशनावर सेन्सॉर केल्याबद्दल लक्ष्य केले होते.