पंतप्रधानांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन..
कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ जगभरातल्या बौद्ध अनुयायांच्या श्रद्धेला समर्पित आहे
“भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणांचा अधिक चांगल्या संपर्कातून विकास आणि भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्यावर विशेष भर”
उडान योजनेअंतर्गत 900 पेक्षा जास्त नवीन मार्ग मंजूर, 350 मार्ग आधीच कार्यरत. 50 हून अधिक नवीन तसेच पूर्वी सेवेत नव्हती, असे विमानतळ कार्यान्वित.
कुशीनगर विमानतळाच्या आधी उत्तर प्रदेशात 8 विमानतळे आधीच कार्यरत. लखनौ, वाराणसी आणि कुशीनगरनंतर जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू. त्याशिवाय, अयोध्या, अलीगढ, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती येथे विमानतळ प्रकल्प सुरू.
“एअर इंडियाशी संबंधित निर्णय भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राला नवी ऊर्जा देईल”
“अलीकडेच सुरू करण्यात आलेले ड्रोन धोरण शेतीपासून आरोग्यापर्यंत, आपत्ती व्यवस्थापनापासून संरक्षणापर्यंतच्या क्षेत्रात जीवन बदलणारे परिवर्तन आणेल”
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.
भारत हे जगभरातील बौद्ध समाजाच्या श्रद्धेचे केंद्र आहे असे उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले. कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बौद्ध समुदायाच्या श्रद्धेला मानवंदना असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रदेश भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीपासून महापरिनिर्वाणा पर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे. हा महत्त्वाचा प्रदेश आज जगाशी थेट जोडला जात आहे, असे ते म्हणाले.
अधिक चांगल्या संपर्कातून आणि भक्तांसाठी सुविधा निर्माण करण्याद्वारे भगवान बुद्धांशी संबंधित ठिकाणांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कुशीनगर येथे दाखल झालेल्या श्रीलंकेच्या विमान आणि शिष्टमंडळाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. महर्षी वाल्मिकी यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना पंतप्रधान म्हणाले की, सबका साथ आणि सबकी प्रार्थना याच्या मदतीने देश सबका विकासाच्या मार्गावर मार्गस्थ झाला आहे. ते म्हणाले, “कुशीनगरचा विकास उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे.”
सर्व प्रकारच्या पर्यटनामध्ये, मग ते श्रद्धेसाठीचे असो किंवा विश्रांतीसाठी, रेल्वे, रस्ते, वायुमार्ग, जलमार्ग, हॉटेल्स, रुग्णालये, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्वच्छता, सांडपाणी प्रक्रिया आणि नूतनीकरणयोग्य उर्जेसह स्वच्छ पर्यावरण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची निकड आहे असे पंतप्रधान म्हणाले. “हे सर्व परस्परांशी जोडलेले आहेत आणि या सर्वांवर एकाचवेळी काम करणे महत्वाचे आहे. आजच्या 21 व्या शतकात भारत फक्त याच दृष्टिकोनाने पुढे जात आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
उडान योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षात 900 हून अधिक नवीन मार्ग मंजूर करण्यात आले आहेत, त्यापैकी 350 पेक्षा जास्त मार्गांवर हवाई सेवा सुरू झाली आहे. 50 हून अधिक नवीन तसेच पूर्वी सेवेत नव्हती असे विमानतळ कार्यान्वित करण्यात आले आहेत असे पंतप्रधानांनी जाहीर केले.
उत्तर प्रदेशातील हवाई संपर्कसेवा सातत्याने सुधारत आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कुशीनगर विमानतळाच्या आधी उत्तर प्रदेशात 8 विमानतळ कार्यरत आहेत. लखनौ, वाराणसी आणि कुशीनगरनंतर जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू आहे. त्याशिवाय अयोध्या, अलीगढ, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद आणि श्रावस्ती येथे विमानतळ प्रकल्प सुरू आहेत असे सांगत पंतप्रधानांनी इथल्या हवाई क्षेत्राशी संबंधित विकासावर प्रकाश टाकला.
एअर इंडियाबाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देत, हे पाऊल देशातील हवाई वाहतूक क्षेत्र व्यावसायिकदृष्ट्या चालवण्यास आणि सुविधा तसेच सुरक्षेला प्राधान्य देण्यास मदत करेल. “हे पाऊल भारताच्या विमानचालन क्षेत्राला नवी ऊर्जा देईल” असे पंतप्रधान म्हणाले. संरक्षण हवाई मार्ग नागरी सेवेसाठी खुला करण्यासंबंधित एक मोठी सुधारणा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या पावलामुळे विविध हवाई मार्गांवरील अंतर कमी होईल. अलीकडेच सुरू करण्यात आलेले ड्रोन धोरण शेतीपासून आरोग्यापर्यंत, आपत्ती व्यवस्थापनापासून ते संरक्षणापर्यंतच्या क्षेत्रात जीवन बदलणारे परिवर्तन आणणार आहे, असा संदेशही पंतप्रधानांनी दिला.
नुकतीच सुरू झालेली पीएम गतिशक्ती- राष्ट्रीय महायोजना, केवळ प्रशासनामध्येच सुधारणा करणार नाही तर रस्ते, रेल्वे, हवाई सेवा इत्यादी वाहतुकीच्या सर्व मार्गांना-व्यवस्थांना आधार देईल आणि परस्परांची क्षमता कशी वाढेल हे सुनिश्चित करेल असे पंतप्रधान म्हणाले.