52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- ईफ्फीसाठी प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु..

जगभरातील 300 हून अधिक चित्रपट यंदाच्या 52 व्या इफ्फीमधे होणार प्रदर्शित

पणजी/मुंबई/नवी दिल्‍ली, 20 ऑक्टोबर 2021

52 वा  भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फी (IFFI) 20-28 नोव्हेंबर 2021 या कालावधीत गोव्यात होणार आहे. सध्याची कोविड -19 ची  परिस्थिती लक्षात घेता, 52 वा इफ्फी (IFFI) मिश्र( हायब्रीड) स्वरूपात आयोजित केला जाईल.

जगभरातील सर्वोत्कृष्ट समकालीन आणि अभिजात चित्रपटांचा व्यापकआणि  विविधांगी पट इफ्फीत मांडला जातो. जगप्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि चित्रपट रसिकांचे महोत्सवात स्वागत केले जाते. चित्रपटांचे सादरीकरण, वर्ग, परिचर्चा, सहनिर्मिती, परिसंवाद इत्यादींच्या माध्यमातून हा चित्रपट आणि कलेचा सोहळा साजरा केला जातो.

52 व्या इफ्फीमधे सहभागी होऊ इच्छिणारे माध्यम प्रतिनिधी पुढिल दुव्यावर अर्थात लिंकवर ऑनलाइन नोंदणी करू शकतात.

https://my.iffigoa.org/extranet/media/

लिंकमधे नमूद केलेल्या पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) मार्गदर्शक सूचनांनुसार माध्यमांना प्रवेशासाठी अनुमती दिली जाईल.

अर्जदारांचे वय 1 जानेवारी, 2021 रोजी  21 वर्षांपेक्षा जास्त असावे आणि त्यांना इफ्फीसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या बातमीदारीचा किमान तीन वर्षांचा व्यावसायिक अनुभव असावा.

जनहितार्थ, अर्जदाराने कोविड-19 प्रतिबंधक लस घेतलेली असावी अशी शिफारस आहे.  लसीची एक किंवा दोन्ही मात्रा घेतलेले प्रतिनिधी नोंदणी पोर्टलवर त्यांचे लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करू शकतात.

14 नोव्हेंबर 2021 च्या मध्यरात्री नोंदणी प्रक्रिया बंद होईल.

ऑनलाइन सहभागाच्या संधी

या वर्षी जानेवारीत झालेल्या 51 व्या इफ्फीप्रमाणेच, 52 व्या महोत्सवातही  संबंधित उपक्रमांना आभासी माध्यमातून उपस्थित राहण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.  अनेक चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित केले जाणार आहेत. इफ्फी संदर्भात पत्र सूचना कार्यालयाद्वारे (पीआयबी) आयोजित सर्व पत्रकार परिषदा पीआयबीच्या युट्यूब वाहिनी youtube.com/pibindia वर थेट-प्रसारित होतील. पत्रकारांना इथे ऑनलाईन प्रश्न विचारण्याची सुविधा असेल.

आभासी व्यासपीठासाठीची नोंदणी प्रक्रीया लवकरच जाहीर केली जाईल.

इफ्फीबद्दल

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) स्थापना 1952 मधे झाली. हा आशियातील सर्वात महत्त्वपूर्ण चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.  सध्या गोवा राज्यात दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जात आहे. जगभरातील चित्रपटांना त्यांच्यातील सर्वोत्तम जगापुढे मांडण्यासाठी एक सामायिक व्यासपीठ प्रदान करणे, विविध देशांच्या चित्रपट संस्कृतीला त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक नीतिमूल्यांच्या अंगाने समजून घेणे, त्यांच्या योगदानाचे कौतुक करणे आणि जगातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्याला प्रोत्साहन देणे हे या महोत्सवाचे उद्दीष्ट आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!