आता मराठीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘बाहुबली’

नवी दिल्ली,

दिग्दर्शक एस.एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचला. ‘बाहुबली’ चित्रपटाचे गारूड, त्याचा प्रभाव यामुळे प्रत्येकजण हरखून गेला. बाहुबलीच्या यशाचे मापदंड या चित्रपटाच्या निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, भव्यदिव्य सेट आणि त्याला उत्तुंग कलात्मक स्वरूप हे ठरले. बाहुबलीच्या या यशाला मानवंदना देत त्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी एक आगळी भेट आणली आहे.

या मराठमोळया ‘बाहुबली’ चित्रपटाची कलात्मक जबाबदारी अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाशी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, कौशल इनामदार, आदर्श शिंदे, बेला शेंडे यासारखे अनेक नामवंत कलाकार जोडले जाणार आहेत.

या मराठी स्नेहल तरडे यांनी बाहुबली चित्रपटाचे लेखन केले आहे. तर बाहुबलीला डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाज दिला आहे. विशेष म्हणजे देवसेनेसाठी सोनाली कुलकर्णीचा आवाज लाभला आहे. त्यासोबतच मेघना एरंडे-शिवगामी, भल्लाल देव-गश्मीर महाजनी, कटप्पा-उदय सबनीस यासारख्या दिग्गज कलाकारांनी बाहुबालीमधील इतर पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अवंतिका या व्यक्तिरेखेला संस्कृती बालगुडे हिचा आवाज असणार आहे.

याचे संगीत दिग्दर्शन कौशल इनामदार यांनी केले असून गीतलेखन वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी केले आहे. आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कर्‍हाडे यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने गुरुवार 4 नोव्हेंबरला दमदार मराठमोळा ‘बाहुबली’ प्रक्षेपित होणार आहे. दुपारी 12.00 वा. आणि सायंकाळी 7.00 वा. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’ वर प्रेक्षकांना मराठी बाहुबली पाहता येणार आहे. त्यामुळे या मराठमोळया बाहुबलीचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!