देशभक्तांसाठी अंदमान आणि निकोबार बेटांना बनवणार तीर्थक्षेत्र ; अमित शहा
नवी दिल्ली,
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतिहासात पुरेसा आदर आणि सन्मान मिळाला नसल्याचे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग-ेसवर टीका केली. नेताजी सुभाषचंद्र बोस अंदमान आणि निकोबार बेटांवर एका जनसभेला संबोधित करताना शहा म्हणाले, नेताजी आणि सरदार पटेल यांना इतिहासात जेवढा सन्मान मिळायला हवा होता, तेवढा त्यांना मिळाला नाही.
शहा पुढे म्हणाले, दोन्ही स्वातंत्र्य सैनिकांचा पंतप्रधान मोदी यांनीच सन्मान केला आणि 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमानमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय भूमीवर प्रथमच ज्या ठिकाणी ध्वज फडकवला होता, त्या ठिकाणी ‘फ्लॅग पॉइंट’चे उद्घाटन केले. स्वातंत्र्य संग-ामादरम्यान सरदार पटेल यांच्या योगदानाचा आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आम्ही केवडियामध्ये जगातील सर्वात उंच पुतळा उभारला. मजबूत भारत बनवण्यामागील त्यांचे योगदान आम्ही कधीही विसरू शकत नाही.
अंदमान आणि निकोबार बेटांना भविष्यात, देशभक्तांसाठी तीर्थक्षेत्र बनवण्याची आमची योजना आहे. आम्ही नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करायला सुरुवात केली आहे आणि लवकरच आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजींचे भव्य स्मारक उभारू. या देशातील सर्व युवकांना मी विनंती करू इच्छितो की, एकदा आमच्या अंदमानला भेट देऊन आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या त्यागाला समजून घ्या, असे ते म्हणाले. दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर 299 कोटी रुपयांचे 14 विकास प्रकल्प आणि 643 कोटी रुपयांच्या 12 प्रकल्पांची पायाभरणी आधीच करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकार या बेटांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, असेही गृहमंत्री शहा या कार्यक्रमात म्हणाले.