मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ : डी.डी. न्यूजचे उपसंचालक नितीन सप्रे
नवी दिल्ली, 15 :
साहित्य संमेलने, मोठ्या प्रमाणात प्रकाशित होणारे दिवाळी अंक,संगीत नाटके आदींची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली असून मराठी वाचन संस्कृती प्रगल्भ असल्याचे प्रतिपादन भारतीय माहिती सेवेचे अधिकारी तथा डी.डी. न्यूजचे उपसंचालक नितीन सप्रे यांनी आज केले.
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात श्री. सप्रे बोलत होते. ते म्हणाले, वाचनाने माणसाच्या ज्ञान कक्षा रुंदावतात आणि व्यक्तिमत्व प्रगल्भ होते. वाचनाने शब्द संपदा वाढते आणि अर्जित केलेले ज्ञान इतरांना दिल्याने ज्ञानाचा प्रसार होतो.
महाराष्ट्रात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची समृद्ध परंपरा आहे, देशातील ही सर्वात जुनी साहित्य परंपरा आहे. राज्यात दिवाळी अंक प्रकाशित होण्याची मोठी परंपरा आहे . या सर्व साहित्यिक चळवळींमुळे महाराष्ट्रात वाचनाची प्रगल्भ परंपरा निर्माण झाली आहे. संगीत नाटक व अन्य कलांचा समृद्ध वारसाही राज्यातील वाचन संस्कृतीला समृद्ध करण्यास महत्त्वाचा ठरल्याचे श्री. सप्रे म्हणाले. मराठी भाषेतील उत्तम कलाकृतींचा अनुवाद होऊन देश-विदेशात मराठी साहित्य पोहोचावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
समर्थ रामदासांच्या कलाकृतींमधून उद्धृत होणारी वाचनाची महती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले अफाट वाचन यावरही श्री. सप्रे यांनी प्रकाश टाकला. माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुणे भेटीप्रसंगी आकाशवाणी पुणेचे प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमांच्या वार्तांकनावेळचे अनुभव कथनही श्री. सप्रे यांनी यावेळी केले.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वाचन संस्कृतीचा होत असलेला प्रवास सुखावह असल्याचे सांगतानाच बदलत्या जीवनशैलीमुळे वाचन कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. परिचय केंद्राच्या तिन्ही भाषेतील ट्विटर हँडल, तिन्ही फेसबुकपेजवर या व्याख्यानाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.वाचन प्रेरणा दिनानिमित्त परिचय केंद्राच्या वतीने समाज माध्यमांद्वारे दिल्लीतील मराठी विद्यार्थ्यांचे वाचन अनुभव व संदेशांचेही प्रसारण करण्यात आले.
महाराष्ट्र सदनात माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन
माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली.
कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांनी डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.