घातपाताचा कट उधळला, दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या, एके-47 सह मोठा शस्त्रसाठाही जप्त
नवी दिल्ली,
जम्मू-काश्मीर मध्ये भारतीय सैन्य दलाने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आता दिल्लीत एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-47 आणि हँड ग-ेनेड तसेच इतरही शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. दिल्लीतील लक्ष्मी नगर परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी मोहम्मद अशरफ हा पाकिस्तानातील पंजाबमधील नरोवल जिल्ह्यात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी मोहम्मद अशरफ हा बनावट ओळखपत्राच्या आधारे भारतीय नागरिक बनून राहत होता. यासाठी त्याने मोहम्मद नुरी नावाचं आपलं बनावट ओळखपत्रही तयार केलं होतं. दिल्लीतील शास्त्री नगर येथील एका घरात तो काम करत होता. भारतीय आयकार्ड बनवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी भारतात एका मोठा घातपात करण्याची योजना आखत होता. त्यासाठी त्याने विशेष ट्रेनिंग सुद्धा घेतली होती.
अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये एके-47 रायफल, काडतुसे, एक हँड ग-ेनेड, 2 पिस्तूल आणि 50 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तसेच त्याच्याकडून एक बनावट पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. या दहशतवाद्याला अटक करुन सणासुदीच्या काळात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा घातपाताचा कट उधळला आहे.
जम्मू-काश्मीर मधील पुंछ सेक्टरमध्ये सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्याचे 5 जवान शहीद झाले होते. दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत सोमवारी भारतीय जवान शहीद झाले होते. या जवानांच्या बलिदानानंतर आता भारतीय सैन्याने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
पुंछ नंतर शोपियान येथील इमामसाहब परिसरातील तुलरान येथे भारतीय सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.