पंतप्रधानांच्या हस्ते पीएम गतीशक्ती या महा अभियानाच्या प्रारंभ

सर्व विभागांना केंद्रीकृत पोर्टलच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रकल्पांची माहिती मिळवणे शक्य होणार

गतिशक्ती अंतर्गत मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीद्वारे मुंबईतील लॉजिस्टिक्स क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या भविष्यासाठी योजना तयार

मुंबई/दिल्ली, 13 ऑक्टोबर 2021

देशातील पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या पीएम गतीशक्ती या मल्टी मोडल कनेक्टिविटीच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील  नव्या प्रदर्शन संकुलाचे देखील पंतप्रधानांनी यावेळी उद्‌घाटन केले.

पीएम गतीशक्ती महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे समग्र नियोजन हितसंबंधींकरता संस्थात्मक करणार आहे. स्वतंत्र पद्धतीने आपापल्या विभागांमध्ये नियोजन आणि रचना करण्याऐवजी, प्रकल्पांची रचना आणि उभारणी सामाईक दृष्टीकोनातून  होणार आहे.हे  महा अभियान केंद्र सरकारची विविध मंत्रालये आणि राज्य सरकार यांच्या  भारतमाला, सागरमाला, देशांतर्गत जलमार्ग, ड्राय/लँड पोर्टस, उडान इत्यादींसारख्या पायाभूत सुविधा योजनांमध्ये एकसूत्रता निर्माण करणार आहे.

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पासह आम्ही येत्या  25 वर्षातल्या भारताचा पाया घालत आहोत. पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन, भारताचा हे मनोसामर्थ्य आणि  आत्मविश्वास, आत्मनिर्भरतेच्या संकल्पापर्यंत घेऊन जाणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. भारतातली जनता, भारताचे उद्योग जगत, भारताचे व्यापार विश्व, भारताचे उत्पादक आणि भारताचे शेतकरी गतिशक्तीच्या या महा अभियानाच्या केंद्रस्थानी आहे, असे ते म्हणाले. भारताचा वर्तमान काळ आणि भावी पिढ्यांसाठी, 21 व्या शतकाचा भारत घडवण्यासाठी हे नवी ऊर्जा देईल, त्यांच्या मार्गातले अडथळे नष्ट करेल असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

बंदरे हे देशाच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे प्रवेशद्वार आहेत. वाहतूक खर्च कमी करणे हे केंद्र सरकारचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आणि हे सरकारला माल खरेदीसाठी व्यवहार आणि वाहतूक खर्च कमी करण्याचे मार्ग शोधण्यासाठी आणि विशेषतः देशातील सागरी मालमत्ता आणि संसाधनांचा वापर करून विविध प्रकल्प हाती घेण्यासाठी योजना आखण्यास प्रवृत्त करते.

केंद्र सरकारने आज 13 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सागरी योजना/गतिशक्ती ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली आहे. मुंबई हे सुमारे 150 वर्षांपासून भारताचे प्रमुख बंदर असल्यामुळे, मुंबई पोर्ट ट्रस्टने जहाज आणि मालवाहतुकीच्या बदलत्या गरजांनुसार   सुविधा, तंत्रज्ञान इत्यादींमध्ये सतत बदल करत या क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले. जेएनपीटी, ज्याचे सुरुवातीला मुंबई पोर्ट ट्रस्टचे उपग्रह बंदर म्हणून नियोजन केले होते, ते आता जगातील अव्वल 30 कंटेनर बंदरांपैकी एक बनले आहे.

या पार्श्व भूमीवर  गतिशीलता महा अभियानात मुंबईतील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश असून त्या अंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टनेही काही योजना आणल्या आहेत. राष्ट्रीय सागरी योजना/गतिशक्ती या अंतर्गत मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीद्वारे मुंबईतील लॉजिस्टिक्स क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने  आखल्या आहेत. 

मुंबई बंदरातली कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापार आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई बंदरात मल्टीमोडल कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देणारे अनेक प्रकल्प गतिशक्ती या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत हाती घेण्यात आले आहेत. या महायोजनेतील मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीमध्ये आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी दोन वैशिष्ट्ये आहेत,

अ) कार्गो संबंधित प्रकल्प आणि ब) सागरी पर्यटन संबंधित प्रकल्प:

कार्गो संबंधित प्रकल्प:

  1. पीओएल क्षमता वाढवणे: 22 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची सर्वात मोठी कच्च्या तेलाची जेटी मरीन ऑइल टर्मिनल इथे पाइपलाइन कनेक्टिव्हिटीसह बांधण्यात  आली  आहे. या प्रकल्पाने पीओएलच्या सागरी वाहतुकीसाठी इतर चार जेटी सुरु केल्या
  2. बंकरिंग टर्मिनल: सामान्य माणसाच्या शब्दात सांगायचे तर हा  जहाजांसाठी लागणारा  पेट्रोल पंप आहे.  मुंबई बंदराला दरवर्षी भेट देणाऱ्या 5,000 हून अधिक जहाज इथे  इधन भरून घेऊ शकतील आणि त्याचा फायदा या पेट्रोल पंपाला होईल.  पाईपलाईन कनेक्टिव्हिटीचा वापर करून जहाजांना इंधन  पुरवठा केला जाईल.
  3. एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायू हस्तांतरणासाठी सुविधा: हा प्रकल्प जमिनीवरील  सुविधांवर भार न टाकता  वार्षिक 5 दशलक्ष टनांपर्यंत स्वच्छ ऊर्जा म्हणून एलएनजी प्रदान करेल .  फ्लोटिंग टर्मिनल समुद्रात असेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायू पुरवठा  पाइपलाइनद्वारे राष्ट्रीय ग्रीडशी जोडला  जाईल.
  4. जेएनपीटी आणि मुंबई दरम्यान कंटेनर बारजिंग : या प्रकल्पामुळे  जेएनपीटी इथून जलमार्ग कनेक्टिव्हिटीद्वारे केवळ 14 किलोमीटर अंतर पार करून अधिक कंटेनर येतील. यामुळे 120 किलोमीटरचा रस्तेमार्गे लांबचा प्रवास टाळता येईल आणि परिणामी प्रदूषण आणि वाहतूक  कोंडी दूर होईल.
  5. किनारपट्टी सुविधा:
    1. इंदिरा गोदीचा शेडसह बर्थ क्रमांक 10, 11, केवळ कोस्टल कार्गो हाताळण्यासाठी राखीव आहे.
    2. खासगी कंपन्यांकडून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर सिमेंट फ्लाय ऍशच्या ठोक साठयासाठी तात्पुरते कोठार उभारणे. या साठी स्वारस्य निविदा आधीच आमंत्रित केल्या आहेत.
  6. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रस्तावित मुंबई दिल्लीच्या समर्पित रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरपर्यंत कनेक्टिव्हिटीसाठी, मुंबई बंदर त्याच्या रेल्वे मालमत्तांवर नव्याने काम करत आहे.    

सागरी पर्यटन संबंधित प्रकल्प खालीलप्रमाणे:

  1. इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनल (ICT): मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल हा क्रूझ पर्यटनासाठी केवळ मुंबईसाठीच नव्हे तर भारतासाठी सर्वात महत्त्वाचा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प  आहे, जो  बॅलार्ड पियर एक्स्टेंशन बर्थवर 500/- कोटी रुपये खर्चून विकसित केला जात  आहे.
  2. प्रिन्स आणि व्हिक्टोरिया डॉक वॉलवर 1 किमी. लांब मुंबई पोर्ट वॉटरफ्रंट: या एकात्मिक जलवाहतूक केंद्रात शहराच्या लोकांसाठी मनोरंजन आणि करमणुकीच्या सर्व आधुनिक सुविधा  असतील. या सुविधेमध्ये रो-पॅक्स टर्मिनल आहे आणि त्यात समुद्राला लागून रेस्टॉरंट्स, अॅम्फीथिएटर, डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल, मरीना, फ्लोटिंग रेस्टॉरंट्स, हार्बर क्रूज, वॉटर टॅक्सी इ.समावेश आहे
  3. रो-पॅक्स टर्मिनल: प्रवासी/पर्यटकांच्या वाहतुकीसाठी  आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जलमार्गाचा वापर करण्यासाठी ही उत्तम सुविधा आहे. मुंबई आणि अलिबागजवळील  मांडवा दरम्यान रो-पॅक्स सेवा या दोन महत्त्वाच्या नोड्सला जोडणारी एक नवीन प्रवासी / पर्यटक वाहतूक सेवा आहे.
  4. शिवडी ते एलिफंटा गुंफा  दरम्यान रोपवे : समुद्रावरील जगातील सर्वात लांब 8 कि.मी. चा रोपवे सार्वजनिक-खासगी भागीदारीने बांधण्यात येत असून यासाठी सुमारे 700/- कोटी खर्च येणार आहे.  हा प्रकल्प शहराच्या लोकांसाठी प्रवासाचे नवीन आकर्षण ठरेल. शिवाय त्यातून सागर किनारा आणि तेथील  मरीन ऑइल टर्मिनल आणि प्रस्तावित शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर मार्ग  या सागरी  सुविधांचे आणि  फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांचे सुंदर दृश्य पहायला मिळेल.
  5. पीएम गतीशक्ती: हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवसाय सुलभता आणि जीवन सुकर करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा उभारणीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम आहे. मल्टी मोडल कनेक्टिविटीमुळे लोकांना प्रवास करण्यासाठी, वस्तू आणि सेवांची वाहतुकीच्या एका साधनातून दुसऱ्या साधनाद्वारे वाहतूक करण्यासाठी एकात्मिक आणि सुविहित कनेक्टिविटी उपलब्ध होणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांचा लाभ शेवटच्या टोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांचा प्रवासाचा वेळ वाचवणे शक्य होणार आहे.

सर्वसमावेशकता, प्राधान्यक्रमाची निश्चिती, सुयोग्य उपयोजन, तादात्म्य, विश्लेषणात्मक, गतीशील या सहा स्तंभावर पीएम गतीशक्ती आधारित आहे

* * *

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!