महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दिल्लीमधील हुमायून कबरीच्या परिसरातील स्वच्छ भारत कार्यक्रमात भाग घेतला
या अभियानाची सुरुवात झाल्यापासून पहिल्या दहा दिवसांतच देशभरात राबविलेल्या स्वच्छ भारत कार्यक्रमाद्वारे 30 लाख किलो कचरा संकलित करण्यात आला : अनुराग ठाकूर
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2021
ठळक मुद्दे:-
- केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय देशातील कचरा आणि मुख्यतः प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने संपूर्ण भारतभर 1 ऑक्टोबर2021 ते 31 ऑक्टोबर2021 या कालावधीत स्वच्छ भारत अभियान राबवीत आहे.
- कचरा आणि मुख्यतः एकदा वापरून फेकून देण्याचा प्लास्टिक कचरा स्वच्छ करण्याकामी लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून ह्या स्वच्छता मोहिमा राबविल्या जात आहेत.
केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अन्य स्वयंसेवकांसह आज नवी दिल्ली येथील हुमायूनच्या कबरीच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता कार्यक्रमात भाग घेतला. युवक व्यवहार विभागाच्या सचिव उषा शर्मा, मंत्रालयाचे इतर ज्येष्ठ अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटनेचे सदस्य तसेच विविध गटांच्या स्वयंसेवकांनी देखील या मोहिमेत भाग घेतला. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने संपूर्ण देशभर आयोजित केलेल्या कचरा आणि मुख्यतः प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठीच्या मोहिमेचा भाग म्हणून या स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
याप्रसंगी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करणे हा स्वच्छ भारत अभियानाचा हेतू आहे.या अभियानाच्या माध्यमातून आम्ही केवळ स्वच्छ भारत कार्यक्रमाचे आयोजन करीत नसून स्वच्छ आणि निरोगी परिसराच्या महत्त्वाबाबत जनजागृती देखील करत आहोत. नागरिकांच्या स्वयंस्फूर्त सहभागाच्या पाठबळावर या अभियानाच्या आयोजनातून 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या महिन्याभरात 75 लाख किलो कचरा, विशेषतः प्लास्टिक कचरा संकलित करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.या अभियानाच्या पहिल्या 10 दिवसांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत कार्यक्रमांतून 30 किलो कचरा संकलित करण्यात यश आले आहे असे ते म्हणाले.
देशवासीयांनी वापरलेली चिप्सची पाकिटे फेकून त्यांच्या आजूबाजूचा परिसर आणि प्लास्टिकच्या बाटल्या तसेच इतर कचरा फेकून रस्ते आणि उद्याने अस्वच्छ करू नये असे आवाहन केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी केले.
स्वच्छ भारत हे युवकांनी चालविलेले अभियान असून नेहरू युवा केंद्र संघटनेशी संलग्न युथ क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजनेशी संलग्न संस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून तसेच विविध भागधारकांच्या सहकार्याने देशभरातील 744 जिल्ह्यांतील 6 लाख गावांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे.
देशभरातील विविध ऐतिहासिक/ प्रसिद्ध स्थळे आणि पर्यटकांचे आकर्षण असलेली ठिकाणे, बस स्थानके/रेल्वे स्थानके, राष्ट्रीय महामार्ग तसेच शैक्षणिक संस्था अशा महत्त्वाच्या आणि गर्दीच्या जागी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत हा केवळ सरकारी कार्यक्रम नसून त्यातून सामान्य माणसाविषयी खरीखुरी चिंता आणि ही समस्या सोडविण्यासाठी मनापासून केलेला निश्चय प्रतिबिंबित होतो.
स्वच्छ भारत कार्यक्रम हा पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात आलेला उपक्रमच नवे लक्ष्य आणि कटिबद्धतेसह पुढे सुरु ठेवण्यात आलेला आहे.स्वच्छ भारत उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्यासाठी ही खरोखरीच एक उत्तम संधी चालून आली आहे.