चेन्नईकडून पराभवानंतर ॠषभ पंत म्हणाला, मी निशब्द झालोय,पण…
नवी दिल्ली,
आयपीएल 2021 च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये काल चेन्नई सुपर किंग्सनं दिल्ली कॅपिटल्सवर चार विकेटसनी विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं नवव्यांदा फायनलमध्ये जागा मिळवली आहे. दिल्लीचा संघ या सामन्यात मजबूत स्थितीत दिसत असतानाही शेवटी त्यांना पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार ॠषभ पंत चांगलाच निराश झाला आहे. त्यानं निराशा व्यक्त करताना आम्ही नक्कीच फायनल मध्ये पोहोचू असाही विश्वास व्यक्त केला आहे.
ॠषभ पंत म्हणाला की, अशा प्रकारे पराभूत होणं निराशाजनक आहे. या पराभवानंतर बोलायला माझ्याकडं काही शब्दच नाहीत. टॉम कुर्रनला शेवटची ओव्हर देण्यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, त्यानं आधी चांगली गोलंदाजी केली होती, त्यामुळं त्याच्याकडून शेवटची ओव्हर टाकून घेतली.
ॠषभ पंत म्हणाला की, आम्ही आधी फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारली. मात्र गोलंदाजी खराब झाल्यानं चेन्नईनं चांगली खेळी केली. त्यानं म्हटलं की, आमच्याकडे फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, आम्ही दुसर्या एलिमिनेटरमध्ये यातून धडा घेऊन चांगली कामगिरी करु आणि नक्कीच फायनलमध्ये पोहोचू.
दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून चेन्नई सुपर किंग्सने विक्रमी 9 व्या वेळी अंतिम फेरी गाठली. कर्णधार एमएस धोनीने चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने अवघ्या सहा चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. त्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. याशिवाय रॉबिन उथप्पा आणि ॠतुराज गायकवाड यांनी अर्धशतके झळकावली. उथप्पाने 44 चेंडूत 63 धावा आणि गायकवाडने 50 चेंडूत 70 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांत 5 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या षटकात सहा गडी गमावून विजय मिळवला.