उपराष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना उत्कृष्ट कार्यासाठी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली,
देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी घालून दिलेले सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचे अनुकरणीय मापदंड अजूनही अतुलनीय आहेत असे सांगत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
प्रख्यात फुफ्फुसतज्ज्ञ आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना उत्कृष्ट कार्यासाठी 22 वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार उप-राष्ट्रपती निवास येथे प्रदान करताना, उपराष्ट्रपती म्हणाले की, शास्त्रीजींनी त्यांनी केलेल्या कृतींची जबाबदारी घेतली, हा त्यांचा सद्गुण आपल्या सार्वजनिक जीवनात अत्यंत दुर्मिळ असा आहे, हा संदर्भ देत, नायडू यांनी सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्याच्या गरजेवर भर दिला.
आपल्या महान देशाबद्दल एक विलक्षण दृष्टिकोन असणारे आदर्श नेते असे शास्त्रीजी यांचे वर्णन करत, ते म्हणाले की लालबहादूर शास्त्री हे त्यांची साधी शिस्तबद्ध जीवनशैली, विनयशीलता आणि निष्कलंक सचोटीसाठी सर्वत्र प्रसिद्ध होते.
भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांच्या अल्पकाळात, शास्त्रीजींनी काही अपवादात्मक धाडसी निर्णय घेतले आणि इतर देशांमधून अन्न पुरवठा आयात करण्यापेक्षा आत्मनिर्भरतेला त्यांनी प्रोत्साहन दिले. 1965 च्या युद्धादरम्यान त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांमुळे त्यांच्या राजकारणाला नवीन आयाम प्राप्त झाला. ‘अन्न संकट आणि पाकिस्तानशी सशस्त्र संघर्षाच्या संदर्भात शास्त्रीजींनी ’जय जवान जय किसान’ ही अमर घोषणा दिली,‘ असे नायडू म्हणाले. त्यानंतर या घोषणेला माजी पंतप्रधान, अटलबिहारी वाजपेयी यांनी ’जय विज्ञान’ आणि विद्यमान पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी ’जय अनुसंधान’ हे शब्द जोडले, असे त्यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती म्हणाले की शास्त्रीजींच्या धाडसी नेतृत्वामुळे इतिहास बदलला आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय समुदायाने नवीन भारताची झलक पाहिली.
प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केल्यानंतर डॉ रणदीप गुलेरिया यांचे अभिनंदन करत, उपराष्ट्रपती नायडू म्हणाले की, ”भारताच्या महान सुपुत्रांपैकी एकाच्या नावाने देण्यात येणार्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी मी यापेक्षा अधिक योग्य पुरस्कार प्राप्तकर्त्याचा विचारच करू शकत नाही.”
ते म्हणाले की, अलीकडच्या काळात महामारीविषयी जागरूकता निर्माण करण्यात डॉ रणदीप गुलेरिया यांची भूमिका आपल्या सर्वांसाठी केवळ आश्वासकच राहिली नाही तर अनेक मंचांवर संवाद साधत त्यांना भेटलेल्या, पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या प्रत्येक व्यक्तीने उपस्थित केलेल्या कोविड-19 शी संबंधित विविध पैलूंवरील शंका त्यांनी दूर केल्या आहेत. ‘कोविड -19 विरुद्ध निस्वार्थपणे अथक लढा देत असलेल्या भारताच्या आघाडीवर राहून काम करणार्या समर्पित योद्ध्यांच्या सैन्याचे कमांडर-इन-चीफ म्हणून त्यांना आम्ही पाहतो”, असे ते म्हणाले. महामारीच्या काळात निस्वार्थ सेवा देणारे देशभरातील डॉक्टर आणि परिचारिका, तंत्रज्ञ, सुरक्षा कर्मचारी, शेतकरी आणि स्वच्छता कामगारांसह आघाडीवर राहून काम करणार्या अन्य योद्ध्यांची त्यांनी प्रशंसा केली.
नायडू म्हणाले, डॉ. रणदीप गुलेरिया यांनी त्यांच्या निवडलेल्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या पायाभूत कार्यासाठी त्यांना मोठे आदराचे स्थान आहे आणि एक अत्यंत कार्यक्षम आणि समर्पित रुग्णालय प्रशासक म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
देशातील तरुणांमध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांच्या वारशाचा प्रसार करण्यासाठी करत असलेल्या कार्याबद्दल उपराष्ट्रपतींनी अनिल शास्त्री आणि लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेची प्रशंसा केली.
लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष अनिल शास्त्री, एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया, लाल बहादूर शास्त्री व्यवस्थापन संस्थेचे संचालक प्रवीण गुप्ता आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.