भारतीय लष्कर आज 9 ऑक्टोबर 2021 रोजी 72 वा प्रादेशिक सैन्य दिन साजरा करत आहे..
नवी दिल्ली 09 OCT 2021
प्रादेशिक सैन्याने 9 ऑक्टोबर 2021 रोजी आपला 72 वा स्थापना दिन साजरा केला. प्रादेशिक सैन्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल प्रीत मोहिंदेरा सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
18 ऑगस्ट 1948 रोजी प्रादेशिक सैन्य कायदा लागू करण्यात आला आणि प्रादेशिक सैन्य सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात आले. सुरुवातीला, प्रादेशिक सैन्यात पायदळ, आर्मर्ड कॉर्प्स, हवाई संरक्षण तोफखाना, सिग्नल, पुरवठा आणि इतर विभागीय युनिट्सचा समावेश होता. 9 ऑक्टोबर 1949 रोजी पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी त्याची औपचारिकरित्या स्थापना केली, जो तेव्हापासून प्रादेशिक सैन्य दिन म्हणून साजरा केला जात आहे .
प्रादेशिक लष्करामध्ये भूमिपुत्र या संकल्पनेवर आधारित होम आणि हर्थ बटालियन व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंटशी संबंधित अनेक युनिट्स आहेत. जम्मू -काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या देखरेखीसाठी इंजिनिअर टीए (TA) बटालियन तैनात आहेत. प्रादेशिक सैन्याकडे 10 इकोलॉजिकल टीए बटालियन देखील असून, त्यांच्याकडे देशाच्या परिसंस्थेच्या संवर्धनाची जबाबदारी असून त्यादृष्टीने ते खडकाळ भागात आणि खराब हवामान असलेल्या भूभागात वृक्षारोपण करतात, पाणथळ जमिनींचे पुनरुज्जीवन करतात, जलाशये पुनर्संचयित करतात आणि चेक डॅम बांधून जलसंधारण उपाययोजना करतात. या व्यतिरिक्त, काही टीए बटालियन भारतीय रेल्वे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात महत्वाच्या जबाबदाऱ्याही कौशल्याने पार पाडतात.