सरकारकडून एमएसएमईंची नोंदणी प्रक्रिया सुलभ. एमएसएमई नोंदणीसाठी फक्त पॅन, आधार आवश्यक.
नवी दिल्ली, 15 जून 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या नोंदणीसाठीची प्रक्रिया सुलभ करण्याची घोषणा केली. आज संध्याकाळी एसएमई स्ट्रीट गेमचेंजर्स मंचाने आयोजित केलेल्या वेबिनारला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, आता एमएसएमईच्या नोंदणीसाठी फक्त पॅन आणि आधार आवश्यक असतील.
नोंदणी झाल्यानंतर एमएसएमई उद्योगाला प्राधान्य आणि निधी मिळेल असे मंत्री म्हणाले . ते म्हणाले की, उद्योजकतेच्या क्षेत्रात आणि इतर संबंधित बाबींसाठी छोट्या उद्योगांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यांनी एमएसएमई मंत्रालयाकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले तसेच बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यादेखील लघुउद्योगांना पूर्ण सहकार्य देतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
एमएसएमईचे महत्त्व अधोरेखित करून गडकरी म्हणाले की, देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करतात . ते म्हणाले की, भारताला जागतिक आर्थिक उर्जा केंद्र बनविण्याच्या उद्देशाने, पाच ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपले योगदान वाढविण्यासाठी पूरक परिस्थितीक व्यवस्था तयार करणे हे एमएसएमईचे उद्दीष्ट आहे
ते म्हणाले की, एमएसएमईच्या आर्थिक क्रियाशक्तीला चालना देण्यासाठी सरकारने ‘आत्मानिर्भर भारत अभियान’ अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचे विशेष प्रोत्साहन पॅकेजे जाहीर केले.