हुश्श! निघाला एकदाचा; मान्सून पावसाचा अखेर परतीचा प्रवास झाला सुरू

नवी दिल्ली,

मान्सून पावसाचा अखेर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून आजपासून सुरुवात झाली आहे. 6 ऑॅक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असे भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरला सांगण्यात आले होते. 1 जूनला मान्सून पावसाला सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे.

गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशच्या काही भागातून मान्सूनच्या परतीसाठी पुढचे 24 तास अनुकूल असल्याचे हवामान तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी सांगितले आहे. याबाबत त्यांनी टिवट करून माहिती दिली आहे.

यंदा नैॠत्य मान्सून वार्‍यांपासून पडणार्‍या पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं यापूर्वीच म्हटलं आहे. 1 जूनला या पावसाला सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून सुरू झाला आहे.

यंदाचा नैॠत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता. तो 30 सप्टेंबरला संपला आहे. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. जुलै आणि ऑॅगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं. तर, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पाऊस पडला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!