काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं

नवी दिल्ली,

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अवघ्या काही तासातच सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 45 हजार 555 कोटी रुपये गमावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेटस यांच्यानंतर पाचव्या स्थानी पोहोचला आहे. काल फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप आणि इन्स्टाग-ामचे जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका थेट फेसबुकला बसला असून फेसबुकचे शेअर्सही 4.9 टक्क्यांनी घसरले आहेत.

फेसबुकच्या शेअर्समध्ये काल 4.9 टक्क्यांची घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीपासूनचा विचार करता फेसबुकच्या शेअर्समध्ये एकूण 15 टक्क्यांची घसरण झाली आहे अशी माहिती ब्लूमबर्गने दिली आहे.

फेसबुकचे शेअर्स घसरल्याने मार्क झुकरबर्गच्या संपत्तीतही घट झाली आहे. त्याची एकूण संपत्ती आता 121.6 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यामुळे तो आता बिल गेटस यांच्या खाली पाचव्या स्थानावर ढकलला गेला आहे. एका आठवड्यापूर्वी मार्क झुकरबर्गची संपत्ती ही 140 अब्ज डॉलर्स इतकी होती असं ब्लूमबर्गने म्हटलं आहे.

फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. 2019 सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून कंपनीला अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दरम्यान, स्लोडाऊनसाठी नेमकं काय कारण आहे याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत होता. या वर्षीच्या जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती 920 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!