ईशान्येकडच्या राज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रस्त्यांच्या उत्तम जाळ्याच्या महत्वावर उपराष्ट्रपतींनी दिला भर

नवी दिल्ली,

ईशान्येकडच्या राज्यांमधल्या पर्यटनाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी,माल वाहतूक सुलभ करण्यासाठी, सेवा प्रदान करण्यात सुधारणा करण्यासाठी आणि या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान देण्यासाठी, या भागात रस्त्यांच्या उत्तम जाळ्याच्या महत्वावर उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी भर दिला आहे. यासंदर्भात ईशान्येकडच्या राज्यांमध्ये, सर्व विकास कामांना गती देण्याचे आणि विविध प्रकल्पांसाठी केंद्राकडून पुरवण्यात आलेल्या निधीचा पारदर्शक आणि उत्तरदायी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय महामार्ग 40 च्या शिलाँग-डाव्की पट्ट्याच्या सुधारणाविस्तारीकरण प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी ते आज बोलत होते. उपराष्ट्रपती सध्या ईशान्येकडच्या राज्यांच्या दौर्‍यावर असून आज ते मेघालय मध्ये दाखल झाले.

इथले सर्व प्रकल्प आपण त्वरेने पूर्ण केले तर ईशान्येकडच्या राज्यांची, देशाच्या विकासाचे इंजिन बनण्याची क्षमता आहे असे ते म्हणाले. ईशान्य भागाच्या विकासाविना देशाचा विकास अपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ईशान्येमध्ये बंडखोरांच्या कारवाया शमल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला. प्रगतीसाठी शांतता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डोंगराळ भाग आणि पावसाळी काळ यामुळे इथे रस्ते बांधकामात अडथळा येतो याची दखल घेत डोंगराळ प्रदेशासाठी रस्त्यांचे बांधकाम आणि रचना यात नाविन्य आणि कल्पकता आणण्याचे आवाहन त्यांनी केले. तंत्रविषयक संस्थांनी ही संधी घेत, रस्ते बांधकामाचा कालावधी कमी करत उत्तम रचना असलेल्या रस्त्यांची आखणी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!