देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के लोकांना देण्यात आले कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस

नवी दिल्ली,

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 25 टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण डोस दिलेल्या लोकांची संख्या 88 कोटींवर पोहोचली आहे. तर 2 ऑॅक्टोबर रोजी कोरोनाची आणखी एक लस मिळेल, अशी शक्यता आहे.

6 कोटींहून अधिक लोकांना देशातील चार मोठ्या राज्यांपैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातने कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. यात गुजरात (40 टक्के), मध्य प्रदेश (27 टक्के) आणि महाराष्ट्र (26 टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील 13.34 टक्के युवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. तर 5 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना पश्चिम बंगाल, राजस्थान, कर्नाटक आणि बिहार राज्यांमध्ये लस देण्यात आली आहे. कर्नाटक (35 टक्के) आणि राजस्थानमध्ये (30 टक्के) तर पश्चिम बंगाल (23 टक्के) आणि बिहारमध्ये (14 टक्के) लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

दरम्यान या आठवड्यात कोरोना प्रतिबंधक डीएनए व्हॅक्सिन झायकोव-डीची किंमत केंद्र सरकार आणि झायडस कॅडिलाकडून ठरवण्यात येणार आहे. ही लस देशात 2 ऑॅक्टोबर रोजी लॉन्च होऊ शकते. भारतीय औषध नियामक मंडळाकडून झायडस कॅडिलाच्या स्वदेशी सुई मुक्त लसीला मंजूरी दिली आहे. 12 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे.

कोरोनाविरोधातील लढाई संपूर्ण देशभरात नेटाने लढली जात आहे. त्याचबरोबर देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंदेखील आता वेग पकडला आहे. 18 वर्षांवरील लोकांचे आतापर्यंत लसीकरण केले जात आहे. आता देशातील लहान मुलांचे देखील लसीकरण केले जाणार आहे. यासाठीची तयारी सुरु झाली आहे. आता कोरोनापासून लहान मुलांना सुरक्षित करण्यासाठी कोरोना लसीकरणाची ट्रायल सुरु आहे. त्यामुळे लहान मुलांसाठी लस लवकरच येण्याची आशा निर्माण झाली आहे. तत्पूर्वी 12 वर्षांवरील मुलांवर ट्रायल सुरु केल्यानंतर आता 7 ते 11 वयोगटातील मुलांवर लसीकरणाच्या ट्रायलला सीरम इंन्स्टिट्यूटला परवानगी मिळाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!